नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील वक्तव्य आणि त्यानंतर काँग्रेसच्या मुंबई कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला या मुद्द्यांवरून काँग्रेससह इतर विरोधक विधानसभेत आज आक्रमक झाले. त्याचवेळी सत्ताधारी सदस्यांनी डॉ. आंबेडकरांविषयी काँग्रेसची भूमिका ‘दुटप्पी’ असल्याच्या घोषणा दिल्या. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

यासंदर्भात दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारल्याने विरोधक आक्रमक झाले. शुक्रवारी सभागृहाचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू झाले. तेव्हा काँग्रेस आणि विरोधी पक्षातील सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र घेऊन सभागृहात दाखल झाले आणि त्यांनी आंबेडकरांचे चित्र आसनासमोर ठेवले. या वेळी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावरील हल्ला झाल्याचा मुद्दा विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. ‘भाजपला सत्तेचा माज आला आहे, त्यांची गुंडागर्दी सुरू आहे,’ असे आरोप केले. त्यामुळे सत्ताधारी बाकांवरील सदस्यही आक्रमक झाले.

हेही वाचा >>>गणवेश शाळांमार्फतच! ‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेत बदल; जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे

डॉ. आंबेडकरांवर आमचाही अधिकार- अजित पवार

विरोधकांच्या बाकांवर डॉ. आंबेडकरांचे चित्र पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ.आंबेडकरांवर आमचाही अधिकार आहे. पुढील बाकांवर आंबेडकरांचे चित्र लावण्याची परवानगी दिली. तशी आम्हालाही द्यावी, अशी मागणी केली. त्यावर अध्यक्षांनी आपण कोणालाही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले.

Story img Loader