नागपूर : महाराष्ट्रात सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीचा मुद्दा गाजतो आहे. दोन्ही पक्षांच्या काही मंत्र्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नागपुरात आगमन झाले. मात्र ते फक्त काही मिनिटांसाठी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे दुपारी २:१५ वा. सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले. विमानतळावरूनच ते तेलंगानातील आदिलाबादच्या कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले.
आदिलाबाद येथे एका सार्वजनिक सभेला ते दुपारी चारच्या सुमारास संबोधित करणार आहेत. सभेनंतर ते हैदराबाद येथे जाणार आहेत. शहा यांच्या स्वागतासाठी विमानतळावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मोहन मते यांच्या शसह नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार,अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे,अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप पाटील,पोलीस उपायुक्त विजय सागर उपस्थित होते.