अकोला : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मिळालेल्या तुतारी चिन्हावरून आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिले. जितेंद्र आव्हाड यांनी एकट्याने तुतारी वाजवून दाखवावी, त्यांना एक लाख रुपये बक्षीस देतो, असे मिटकरी यांनी जाहीर करीत धनादेश लिहिला. तो धनादेश लिहिताना अमोल मिटकरी यांनी केलेल्या घोडचुकीमुळे ते स्वतःच आता समाजमाध्यमांवर ट्रोल होत आहेत. आमदार असताना साधा धनादेश लिहिता येत नसल्याने विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. अमोल मिटकरी यांनी ही चूक नकळत केली की जाणीवपूर्वक? यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला तुतारी चिन्ह दिले. शनिवारी किल्ले रायगडावर त्या चिन्हाच्या अनावरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. रायगडावर जितेंद्र आव्हाड यांनी सामूहिकरित्या तुतारी वाजवल्यावरून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली. तुतारी वाजवण्याचे आव्हान देखील त्यांनी दिले. ते म्हणाले,”५० हजार रुपये महिन्याच्या पगारावर अजितदादांनी ठेवल्याचे आव्हाड माझ्याबाबत म्हणत असतात. दोन महिन्यांचा पगार आज आव्हाड यांना देतो. एक लाख रुपयांचा माझा चेक तयार आहे. जितेंद्र आव्हाड यांनी तो कधीही घेऊन जावा. फक्त तुतारी त्यांनी एकट्याने वाजवावी आणि तुतारीच्या तोंडातून आवाज काढावा, ही माझी अट आहे.”

हेही वाचा…छोट्या पक्षांचा भारतीय जनता पक्षाने सन्मान केला – बावनकुळे

२६ तारखेपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला होऊ घातले आहे. विधान भवनात पहिल्याच दिवशी त्यांनी स्वतः पत्रकारांसमोर तुतारी वाजवावी आणि एक लाख रुपयांचा चेक माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याकडून घेऊन जावा, असे आव्हान अमोल मिटकरी यांनी आव्हाड यांना दिले. अमोल मिटकरी यांनी आव्हान दिल्यावर जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी लिहिलेला धनादेश देखील दाखवला.

अमोल मिटकरी यांनी दाखवलेल्या धनादेशात मोठी चूक आहे. धनादेश ज्याला द्यायचा त्याचे नाव जिथे लिहायचे त्या ठिकाणी मिटकरी यांनी अक्षरात एक लाख रुपयांची रक्कम लिहिली, तर जिथे अक्षरात रक्कम लिहायची, तिथे जितेंद्र आव्हाड यांचे नाव लिहिले आहे. आव्हाड यांना आव्हान देण्याच्या नादात मिटकरी चुकीच्या पद्धतीने धनादेश लिहिण्याची घोडचूक करुन बसले. त्यामुळे तो धनादेश आता बँकेत तर निश्चितच वटणार नाही. बँकेत तो लावला तर धनादेश बाउन्स होईल. अमोल मिटकरी यांच्या या चुकीसाठी त्यांच्यावर समाज माध्यमातून जोरदार टीका होत आहे. अमोल मिटकरी यांनी ही चूक का केली? यावरून आता चर्चा होत आहे.

हेही वाचा…“मी मरेन किंवा…”, सागर बंगल्याच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा; म्हणाले, “पोलिसांना सांगा…”

आव्हाड व मिटकरी यांच्यात वाकयुद्ध

जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ चांगला एडिट केला, आता धनादेश बरोबर लिहायला शिका, असा टोला त्यांच्या ‘एक्स’ खात्यावरून लगावला आहे. हा कट कुठे रचला? यामागे कोण? असा सवाल आव्हाड यांनी केला. त्याला अमोल मिटकरी यांनी ‘एक्स’ खात्यावरच प्रत्युत्तर दिले. हा कट नव्हे तर चर्चा आहे, मूर्ख बनवण्याची पण हद्द असते राव, असे मिटकरी म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari challenge to jitendra awahd for play tutari made mistake while writing check trolled on social media ppd 88 psg