देवेंद्र फडणवीसांकडे अकोल्या जिल्ह्याचं पालमंत्रीपद आहे. मात्र, त्यांनी जिल्ह्याला वाऱ्यावर सोडलं आहे. काल पोहरा देवीला जाण्यासाठी फडणवीस अकोल्यात आले. मात्र, ते हवेत आले आणि हवेत गेले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांच्याबाबतही भाष्य केलं.
हेही वाचा – ‘महाराष्ट्राचा विजय!’ राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, “महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना…”
काय म्हणाले अमोल मिटकरी?
“पोहरादेवी विकास आराखड्याच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. ते अर्थमंत्री आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि आठ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. अकोला जिल्ह्याचं पालकत्वही त्यांच्याकडे आहे. यापूर्वी ते दोन वेळा अकोल्यात केवळ पाच-पाच मिनिटांसाठी आले होते. मात्र, आता ते केवळ व्हिसीद्वारे येतात आणि काल तर हवेत आले आणि हवेत गेले”, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.
“फडणवीसांनी अकोल्याला वाऱ्यावर सोडलं”
“देवेंद्र फडणवीसांनी अकोल्या जिल्ह्याला वाऱ्यावर सोडलं आहे. अकोला जिल्हा आज क्राईम कॅपिटल बनत आहे. ते गृहमंत्री असताना नागपूर क्राईम कॅपिटल बनलं होतं. तसेच आज अकोला बनत आहे. अकोला, अमरावती, भंडाला ज्या-ज्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत, ते सर्व जिल्हे त्यांनी वाऱ्यावर सोडले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे हवेतले पालकमंत्री आहेत”. असा टोलाही त्यांनी लगावला.
“…म्हणून भाजपाने कोश्यारींना पायउतार केलं”
दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी भगतसिंह कोशारींच्या राजीनाम्यावरही भाष्य केलं. “वादग्रस्त विधानानंतर कोश्यारींचा राजीनामा घ्यावा, ही महाविकास आघाडीची भूमिका होती. मात्र, या मुजोर सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही. २६ फेब्रुवारीपासून राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण होतं असतं. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोश्यारींना झालेला विरोध बघता भाजपाने त्यांना पायउतार केलं”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नव्या राज्यपालांना केली ‘ही’ विनंती
“महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आता रमेश बैस येणार आहेत. त्यांना आमची विनंती आहे, की त्यांनी महाराष्ट्रात येण्यापूर्वी राज्याचा भौगोलिक आणि राजकीय अभ्यास करावा. महाराष्ट्रातील महापुरुषांवर किंवा मराठी माणसांवर कोणतीही वादग्रस्त विधान करु नये. घटनेच्या चौकटीत राहून राज्यपालपदाला साजेसं वर्तन त्यांनी करावं”, असे ते म्हणाले.