अमरावती : अमरावती महापालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू असून सुमारे १६ हजार १६० जागा उपलब्ध आहेत. यासाठी ९ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यानुसार प्रवेशाच्या तीन फेऱ्या आटोपल्या. तरीही ९ हजार ५९४ जागा रिक्त आहेत. यासाठी सोमवार, ५ ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर ८ ऑगस्टपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार असल्याची माहिती अशी माहिती प्रवेश समन्वयक प्रा. अरविंद मंगळे यांनी दिली आहे.
अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ९ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग २ भरला. त्यानुसार तीन फेऱ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली. शहरातील ६८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या वर्षी प्रवेशासाठी २४ मेपासून नोंदणी सुरू झाली. ५ जूनपासून विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पसंती दर्शवणारा अर्ज क्रमांक दोन भरण्यास सुरुवात केली. त्यानंतर १८ जूनला इनहाऊस, अल्पसंख्याक कोटा यादी प्रसिद्ध करून १८ ते २९ जून दरम्यान शून्य प्रवेश फेरी झाली राबवण्यात आली.
हेही वाचा…नागपूर: परीक्षेला जाताना तरुणी अपघातात ठार
तांत्रिक अभ्यासक्रमांकडे कल
सध्या विद्यार्थ्यांचा कल व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे अधिक असल्याचे दिसून आले आहे. दहावीनंतर विविध विषयांचे अल्पकालीन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याशिवाय तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमाला देखील विद्यार्थी प्राधान्य देतात. तंत्रनिकेतन पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमात थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्येही विविध अभ्यासक्रम आहेत.
कमी कालावधीत तंत्रशिक्षण घेऊन नोकरी किंवा स्वयंरोजगारासाठी पदविका अभ्यासक्रमाला पसंती दिली जाते. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यात ६ तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये १ हजार ५४८ जागा उपलब्ध आहेत. आतापर्यंत ६ हजार ६०० विद्याथ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केलेत. यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग ३६०, कॉम्प्युटर ९४, इलेक्ट्रॉनिक्स ३२४, मेकॅनिकल ३००, केमिकल ६०, इलेक्ट्रिकल १२०, प्लास्टिक पॉलिमर ३०, आय. टी. ६० अशा एकूण १५४८ जागा आहेत. प्रवेशासाठी अधिक स्पर्धा आहे.
हेही वाचा…Shravan 2024: श्रावण मास, श्रावणी सोमवार आणि शिवामूठ…नेमकं महत्त्व काय? जाणून घ्या…
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये १४०० प्रवेश निश्चित
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेश घेण्यासाठी देखील गर्दी दिसून आली आहे. आयटीआय प्रवेशाला टीआय प्रवेशाला १४ जुलैपासून सुरुवात झाली. ४२९० जणांची प्रथम फेरीसाठी निवड झाली असून, त्यापैकी १४०० प्रवेश निश्चित झाले आहेत. दोन दिवसात ३५ टक्के जागा भरलेल्या आहेत. यंदा २७०८ जागांसाठी ११८६४ अर्ज प्राप्त झाले आहेत.