अमरावती : खासगी प्रवासी वाहतूक करताना नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) दंडात्मक कारवाई केली जाते. नागपूर ते खंडवा, अमरावती ते खंडवा, अमरावती ते बैतुल या मार्गाने मध्यप्रदेशात जाणाऱ्या सुमारे ५९ खासगी बसगाड्यांची परतवाडा या मार्गावर तपासणी करण्यात आली. यामध्ये आतापर्यंत २५ सदोष वाहने आढळून आली आहेत.
खासगी बसचालकांवर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये दंडात्मक कारवाई करून सुमारे १ लाख ६७ हजार ७६५ रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे. यापैकी ६२ हजार ४७५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही मोहीम गेल्या २ जानेवारीपासून राबविण्यात आली आहे.
हेही वाचा – गडचिरोली : दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, तब्बल ५३ गुन्ह्यांची…
वाहनचालकांना रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती करण्यात येत आहे तसेच ही मोहीम यापुढेही सुरू राहील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिली आहे. या मार्गावर आरटीओ विभागामार्फत प्रत्येक खाजगी प्रवासी वाहनांची तपासणी केली जात आहे. या तपासणी मोहिमेत आरटीओ विभागाची दोन वेगवेगळे पथके आहेत. दोन्हीही वायूवेग पथकाद्वारे या मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक खाजगी ट्रॅव्हल्सची तपासणी सुरू आहे.
तपासणी दरम्यान संबंधित बस वाहनचालक मद्यप्राशन करून वाहन चालवीत आहे का, याच्या तपासणीसाठी ब्रीथ ॲनलायझर यंत्राचा वापर करण्यात येत आहे.
परवान्याच्या अटीचा भंग, टप्पा वाहतूक, अवैधरित्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र, रिप्लेकटर, इंडिकेटर, टेल लाईट, व्हायपर, वाहनांमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, जादा भाडे आकारणी, वाहन कर , अग्निशम कार्यरत असणे, फिटनेस आदी बाबी मोटार वाहन कायद्यान्वये तपासणी करण्यात येत आहेत. तसेच खाजगी बस संचालक प्रवाशांकडून जादा भाडे आकारत आहेत का, याची तपासणी करण्यात येत असून वाहतूकदारांच्या ठिकठिकाणी बुकिंग कार्यालयांना भेटी देऊन अधिकारी ऑनलाईन आरक्षित केलेल्या तिकिटांचा तपशील व ऑफलाईन आरक्षणात केलेल्या तिकिटांचा तपशील देखील तपासत आहेत. आतापर्यंत केलेल्या तपासणीत जादा तिकीट दर घेतल्याची अद्याप एकही तक्रार आरटीओ विभागाकडे आली नाही.
हेही वाचा – बुलढाणा : वाळू तस्करांचा हैदोस, तलाठ्यावर चक्क टिप्पर घालून…
प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक पल्लवी दौंड, विशाल नाबदे, सहायक मोटार वाहन निरीक्षक अमोल बोरे, ऋषिकेश गावंडे, कांचन जाधव हे अधिकारी या मार्गावर तपासणी करीत आहेत.