नागपूर : राज्य सरकारच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अखत्यारितील अमरावती विमानतळाचे उद्घघाटन सोहळा १६ एप्रिल २०२५ रोजी होत असून त्याचे निमंत्रण संबंधितांना पाठवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होऊ घातलेल्या या सोहोळ्याचे निमंत्रण एमएडीसीने पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अमरावती विमानतळाचा बहुप्रतीक्षित उदघाटन कार्यक्रम आता निश्चित झाला आहे. एमएडीसीने हा प्रसंग कंपनीच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे, असे म्हटले आहे.
अलायन्स एअर कंपनीची मुंबई- अमरावती -मुंबई ही विमानसेवा येत्या १६ एप्रिलपासून सुरू होणार आहे. पहिले विमान सकाळी ११.३० वाजता अमरावतीहून मुंबईच्या दिशेने निघेल. अलायन्स एअर ही विमान कंपनी अमरावतीवरुन मुंबई अशी विमान सेवा सुरू करत आहे. या विमानसेवेचे वेळापत्रक विमान कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे. विमान सेवा आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी असणार आहे. येत्या १६ एप्रिलला पहिले विमान मुंबई विमानतळावरून सकाळी ८.४५ वाजता उड्डाण घेणार असून त्याच दिवशी विमानसेवेच्या शुभारंभानंतर सकाळी ११.३० वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. १८ एप्रिलपासून विमानसेवेच्या वेळेत बदल होणार आहे. १८ एप्रिलला विमान मुंबईवरुन दुपारी २.३० वाजता अमरावतीकडे निघेल. अमरावतीला ४.१५ वाजता पोहोचेल. तर अमरावतीवरुन दुपारी ४.४० वाजता विमान निघेल आणि सायंकाळी ६.२५ वाजता मुंबईत पोहोचेल.
प्रादेशिक संपर्क योजना (आरसीएस) उडानअंतर्गत व्यावसायिक विमानसेवा एटीआर-७२ अमरावती विमानतळाहून सुरू होत आहे. या लोकार्पण सोहळ्याला आमदार, खासदारांसह प्रशासकीय अधिकारी, राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. या सोहोळ्याचे निमंत्रण सर्व आमदार, खासदार, मंत्री यांना देण्यात आले. तसेच माध्यम प्रतिनिधींना इ-मेलद्वारे निमंत्रण देण्यात आले असून विमानतळ उद्घाघटनासाठी सज्ज झाला आहे.
अमरावती आता उड्डाण घेत आहे!
पहिल्या यशस्वी विमान सेवेसह, अमरावतीने आता हवाई नकाशावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि ही तर फक्त सुरुवात आहे! आकाश हे मर्यादा नाही, तर नव्या संधींचा प्रारंभ आहे. भव्य उद्घाटनाच्या प्रतीक्षेत रहा आणि महाराष्ट्राच्या प्रादेशिक हवाई संपर्काच्या नव्या युगाच्या साक्षीदार बना, असे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने म्हटले आहे.