अमरावती : अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवेचा शुभारंभ येत्‍या १६ एप्रिल रोजी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जिल्‍ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत होणार असून ऑ‍क्‍टोबरपर्यंत विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा (रात्री विमान उतरण्याची सुविधा) सुरू होऊ शकेल, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

स्वाती पांडे म्हणाल्या, सर्व हवामान ऑपरेशन आणि इन्स्ट्रूमेट फ्लाईट रूल्स (आयएफआर) करीता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची (डीजीसीए) परवानगी घ्यावी लागणार आहे. नाईट लँडिंगसाठी आवश्यक प्रणाली येत्या जून पर्यंत कार्यान्वित होऊ शकेल. डीजीसीएच्या परवानगीनंतर ऑक्टोबरपर्यंत नाईट लँडिंग सुविधा विमानतळावर उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

स्वाती पांडे म्हणाल्या, अमरावती विमानतळाला सार्वजनिक वापरासाठी अधिकृतपणे एअरोड्रम परवाना प्राप्त झाला आहे. १९९२ मध्ये या विमानतळाला ‘ब्राऊन‍ फिल्ड’ विमानतळ म्हणून विकसित करण्यास सुरूवात झाली. थोड्या उशिरा का होईना या विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू होत आहे, याचा आनंद आहे. प्रादेशिक कनेक्टिव्हिटी स्कीम (आरसीएस-उडान) अंतर्गत विमानतळाचे रुपांतर व्यावसायिक सुविधेत करण्यात आले आहे. विमानतळाचे एकूण क्षेत्र हे ४११ हेक्टर आहे. १८५० मीटर लांब आणि ४५ मीटर रुंदीची धावपट्टी तयार करण्यात आली असून विमानतळाची इमारत २६०० चौरस मीटर क्षेत्रात उभारण्यात आली आहे. गर्दीच्या वेळी सुमारे २०० हून अधिक प्रवासी क्षमता या ठिकाणी आहे. २६ मीटर उंचीचे एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर बांधण्यात आले आहे. एकाचवेळी दोन एटीआर-७२ विमाने या ठिकाणी येऊ शकतात.

हे विमानतळ विदर्भाच्या अर्थव्यवस्था, व्यापार, पर्यटन आणि हवाई संपर्कासाठी महत्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे उडान योजनेअंतर्गत विकसित हे विमानतळ केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर उद्योग, व्यवसाय आणि प्रवाशांसाठी सुवर्णद्वार ठरणार आहे. प्रादेशिक हवाई संपर्काच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे, जी अमरावती आणि संपूर्ण प्रदेशासाठी प्रगतीची नवी दारे उघडेल. भविष्यात सुरत, अहमदाबाद विमान सेवा सुरू करण्याचा प्रयत्न राहील, असे स्वाती पांडे यांनी सांगितले.

विमानतळाच्या लोकार्पण कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू झाल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाला अधिक चालना मिळेल, असे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यानी सांगितले.