अमरावती : काँग्रेसच्‍या अमरावती विधानसभा मतदारसंघातील आमदार सुलभा खोडके यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्‍यात आले आहे. पक्षविरोधी कारवाया केल्‍याचा ठपका त्‍यांच्‍यावर ठेवण्‍यात आला आहे. काँग्रेसचे महाराष्‍ट्राचे प्रभारी रमेश चेन्‍नीथला यांनी दिलेल्‍या सुचनेनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी ही कारवाई केली आहे. २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीमध्‍ये आणि त्‍यानंतरही आपण सतत पक्षविरोधी काम केल्‍याच्‍या अनेक तक्रारी प्रदेश कार्यालयाकडे प्राप्‍त झाल्‍या होत्‍या. त्‍यानुसार महाराष्‍ट्र प्रभारी रमेश चेन्‍नीथला यांच्‍या निर्देशावरून आपणास काँग्रेस पक्षातून पुढील सहा वर्षांसाठी निलंबित करण्‍यात येत आहे, असे नाना पटोले यांनी आमदार सुलभा खोडके यांना पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे.

विधान परिषदेच्‍या निवडणुकीत काँग्रेसच्‍या काही आमदारांनी ‘क्रॉस व्‍होटिंग’ केल्‍याची चर्चा होती. या आमदारांमध्‍ये सुलभा खोडके यांचेही नाव समोर आले होते, पण सुलभा खोडके यांनी हा आरोप फेटाळून लावला होता.

हे ही वाचा…देवळालीत तोफगोळ्याचा स्फोट, लष्कराकडून चौकशीचे आदेश

गेल्‍या निवडणुकीत सुलभा खोडके यांनी भाजपचे त्‍यावेळचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांना पराभूत करून विधानसभा गाठली होती. त्‍यांचे पती संजय खोडके हे राष्‍ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत. उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या ते निकटचे मानले जातात. २०१९ मध्‍ये देखील सुलभा खोडके यांच्याकडे दोन पर्याय होते, काँग्रेसकडून निवडणूक लढावी की राष्ट्रवादी काँग्रेसकडून, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी असल्याने अमरावतीची जागा काँग्रेसला मिळाली आणि सुलभा खोडके यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती.

दरम्‍यान, सुलभा खोडके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसच्‍या नेत्‍यांवर टीका केली होती. रमेश चेन्‍नीथला हे अमरावतीच्‍या भेटीवर असताना आयोजित कार्यक्रमांमध्‍ये आमदार म्‍हणून आपल्‍याला सन्‍मान देण्‍यात आला नाही. स्‍थानिक नेत्‍यांनी आपला अनेकवेळा अपमान केला, असा आरोप सुलभा खोडके यांनी केला होता.

हे ही वाचा…परतीच्या पावसाचा वीज पुरवठ्याला फटका, गंगापूर रस्त्यावरील काही भाग २४ तास अंधारात

विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगचा आरोप करण्यात आला. तो कुणी केला? याला अधिक महत्व आहे. काँग्रेसकडून उमेदवारीसाठी रांगेत असलेल्यांनी हे आरोप केले आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी केलेले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावती मतदारसंघासाठी भरघोस निधी दिला, त्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यासाठी १३ ऑक्‍टोबरला अमरावती आयोजित राष्‍ट्रवादीच्‍या कार्यक्रमाला आमदार म्हणून उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. सुलभा खोडके या अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.