अमरावती : शहरातील पंचवटी येथील सिग्नलवर दोन कलाकारांची नृत्य करतानाची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारीत झाल्यानंतर तिखट प्रतिक्रिया उमटली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर दोघांनी माफीही मागितली. पण, या प्रकारामुळे ‘लाईक’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवण्याच्या नादात मर्यादा ओलांडली जात आहे का, हा प्रश्न चर्चेत आला आहे. जिल्ह्यातील अनेक ‘इन्फ्लूएन्सर्स’चे ‘फॉलोअर्स’ लाखांमध्ये आहेत. ‘रीलस्टार्स’ मधील स्पर्धा ही आता वेगळ्याच वळणावर पोहचली आहे.

‘रीलस्टार’ देविदास इंगोले हे वाहनचालक म्हणून काम करतात. ते सांगतात, मी गोव्यात गेलो, त्यावेळी सहजपणे विदेशी पर्यटकांसोबत ‘रील’ तयार केली, ती चांगलीच गाजली, त्यानंतर मित्रांनी प्रोत्साहन दिले. पण पंचवटी येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करून ‘रील’ तयार करणे, ही माझी सर्वात मोठी चूक होती, ती आता पुन्हा करणार नाही. देविदास इंगोले यांच्यासोबत नृत्य करणाऱ्या राणी राठोड यांनी देखील क्षमायाचना केली आहे.

२०२२ मध्ये पुष्पा-१ प्रदर्शित झाल्यानंतर ‘श्रीवल्ली’ या गाण्याच्या स्टाईलने अनेकांना भूरळ पाडली होती. या गाण्याचे मराठी व्हर्जन अमरावतीत जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील निंभोरा येथे राहणाऱ्या विजय खंडारे या तरूणाने तयार केले. ते चांगलेच व्हायरल झाले होते. विजयने त्याच्या पत्नीसोबत काढलेल्या अनेक ‘रील’ गाजल्या.

अमरावती जिल्ह्यात अनेक ‘रीलस्टार्स’चे लाखांवर फॉलोअर्स असून कमाई देखील लाखांमध्ये आहे. अमरावतीच्या राठीनगरातील शशांक उडाखे, मोर्शी तालुक्यातील बिपीन माहुरे आणि त्याची सहकारी तन्वी काकड, रवी वानखडे, प्रज्ञा राऊत, सारंग सोनवणे, अश्विन वाकोडे यांच्यासह अनेक कलावंतांनी समाज माध्यमांवर स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

चाहत्यांची संख्या महत्वाची असते. त्याचा उपयोग जाहिरात किंवा प्रमोशनसाठी होतो. त्या मोबदल्यात त्यांचे अर्थार्जन देखील होते. फॉलोअर्सची संख्या, हिट/व्ह्यूज अशा गोष्टी या कलाकारांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या ठरतात. त्यावरच त्यांची आर्थिक घडी बसते. अनेक कलावंत हे सामान्य ते गरीब कुटुंबातील आहेत. त्यांनी संघर्ष देखील केला आहे.

हे कलाकार समाजातील विविध मुद्यांवर भाष्य करतात. ठाम बाजू मांडतात. तुमच्या अंगभूत कला समाज माध्यमांच्या मंचावर वापरा, दुसऱ्यांचे बघून या क्षेत्रात येऊ नका. कुणाला कॉपी करू नका, समाज माध्यमांवर देखील स्पर्धा आहे. संघर्ष करूनच यश मिळवावे लागते. येथे कुठेही शॉर्टकट नाही. कंटेट प्रभावी आणि रंजक पद्धतीने मांडता यायला हवी, असे या कलाकारांचे म्हणणे आहे.