अमरावती : दर्यापूर तालुक्यातील एका सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचारानंतर उपचारासाठी दिरंगाई केल्याप्रकरणी संबंधित अधिपरिचारिकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय देण्यात आल्याचा आरोप करीत भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज बुधवारी जिल्हा शल्य चिकित्सकांना जाब विचारला, यावेळी एका कार्यकर्त्याने कक्षातच स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी लगेच या कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या १८ जानेवारी रोजी दर्यापूर तालुक्यातील सहा वर्षीय मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला. पीडित मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र रुग्णालयातील दोन अधिपरिचारिकांनी पीडित मुलीला दीड तास थंडीत फरशीवर बसवून ठेवले, तिला बेड आणि कक्ष देखील उपलब्ध करून देण्यात आला नाही, याबद्दल विचारणा करण्यासाठी गेलेल्या भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसोबत संबंधित अधिपरिचारिकांनी अरेरावीची भाषा वापरून पीडित मुलीच्या नातेवाईकांसोबत गैरवर्तणूक केली आणि तिच्यावर उपचार केले नाहीत, असे भीम ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते.

दरम्यान, या मुद्यावर भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात २० जानेवारी रोजी जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर संबंधित अधिपरिचारिकांना निलंबित करण्यात आल्याचे पत्र कार्यालयाकडून देण्यात आल्यानंतरही एक कर्मचारी त्याच दिवशी कामावर हजर होत्या आणि दुसऱ्या कर्मचारी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्तक्षेपानंतर या दोन कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यात आली, असा आरोप राजेश वानखडे यांनी केला होता.

या प्रकरणात जातीभेद करण्यात आल्याचा आरोपही भीम ब्रिगेडने केला. संघटनेतर्फे आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. दरम्यान, राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयात पोहचले. राजेश वानखडे हे दिलीप सौंदळे यांच्यासोबत चर्चा करीत असताना अचानकपणे एका कार्यकर्त्याने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले. त्यानंतर लगेच इतर कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी पकडून ठेवले. त्याला सुरक्षितपणे पोलिसांनी कक्षाच्या बाहेर नेले. या घटनाक्रमामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात काही काळ गोंधळ उडाला.

एका सत्ताधारी पक्षाच्या खासदाराच्या म्हणण्यावरून जर कारवाई मागे घेतली जात असेल, तर ते चुकीचे आहे. आम्ही अन्यायाच्या विरोधात दाद मागण्यासाठी उभे आहोत. आम्ही आंदोलन केले, की रुग्णालयातील कर्मचारी कामबंदचा इशारा देतात, हे योग्य नाही, असे राजेश वानखडे यांनी सांगितले.