अमरावती : केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने नशा मुक्त भारत अभियान (एनएमबीए) अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थाच्या वापराविरोधी जनजागृती करण्यासाठी विविध उपाय योजना हाती घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. अमली पदार्थाचे सेवन आणि तस्करी रोखण्यासाठी उपाय म्हणून शालेय स्तरावर व्यापक जागरूकता कार्यक्रम आवश्यक असल्याचे सांगितले आहे. त्यास अनुसरून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्यामार्फत त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशा प्रकारचे आदेश जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) आणि प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. आता शिक्षकांना नशा मुक्तीचे धडे विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहेत. विविध उपक्रमाने व त्याची लिंक भरण्यास आता मुख्याध्यापक, शिक्षक कंटाळले असून अशा उपक्रमांवर शिक्षक, मुख्याध्यापक बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने शिक्षकांकडे शैक्षणिक व अशैक्षणिक कामे कोणती याचा शासन आदेशच काढला आहे.
शालेय स्तरावर अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम राबविणे विद्यार्थ्यांना अमली पदार्थाच्या धोक्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. त्या अंतर्गत विविध कार्यक्रम शाळांमध्ये राबविण्यात यावेत, असे आदेश दिले आहेत. शाळेत विशेष चर्चा सत्र व कार्यशाळा शाळांमध्ये तज्ञ व्यक्ती आणि डॉक्टर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करावी. प्रभावी दृकश्राव्य साधने, अमली पदार्थाचे दुष्परिणाम स्पष्ट करणारे व्हिडिओ, पोस्टर, पावर पॉइंट सादरीकरणाचा उपयोग करावा, विद्यार्थ्यासाठी समुपदेशन सत्रे- मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती यावर भर देणारी समुपदेशनसत्रे घ्यावीत, नशा मुक्त भारत अभियानातील सहभाग भारत सरकारने दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी नशा मुक्त भारत अभियानाचा पाचवा वर्धापन दिन साजरा केला आहे. त्या निमित्ताने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना देण्यात आलेल्या आहे.
एनएमबीए अंतर्गत सर्व विद्यार्थी शिक्षक व पालकांनी प्रतिज्ञा घ्यावी आणि एनएमबीएच्या पोर्टलवर नोंदणी करावी तसेच या अंतर्गत अमली पदार्थ विषय जनजागृती मोहीम, कार्यशाळा आणि विविध उपक्रम राबविण्यात यावे, असे आदेश आहेत. आता शाळांच्या परीक्षा सुरु होत आहेत. निपूण सारखा उपक्रम सुरु आहे. नवीन प्रवेशासाठी शिक्षकांना पालक भेटी, सभा घ्याव्या लागतात. अशा वेगवेगळ्या उपक्रमामुळे शिक्षक, मुख्याध्यापक कंटाळले असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेची पटसंख्या घसरत असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली आहे.