अमरावती : सध्या समाज माध्‍यमांवर प्रँक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रँक व्हीडिओमुळे अनेकांना तुरुंगवारीही करावी लागली आहे. आता असाच प्रकार येथील एका मॉलमध्‍ये उघड झाला आहे. प्रँक करणाऱ्या एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सैय्यद अवेन सैय्यद नासीर (१९, रा. हनुमान नगर) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या तरूणाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील बडनेरा मार्गावरील एका मोठ्या मॉलमध्‍ये स्‍वच्‍छतागृहात गेलेल्‍या व्‍यक्‍तीला घाबरविण्‍यासाठी प्रँक करण्‍याचे प्रकार हा आरोपी तरूण करीत होता. एखादी व्‍यक्‍ती स्‍वच्‍छतागृहात गेली की आतमध्‍ये रॉकेट सोडायचे किंवा दरवाजाच्‍या आतून पेट्रोल टाकून भडका उडवण्‍याच्‍या प्रसंगाचे व्‍हीडिओ चित्रिकरण करून ते समाज माध्‍यमांवर प्रसारीत करण्‍याचा वेगळाच उद्योग या तरूणाने सुरू केला होता. हा गंभीर प्रकार निदर्शनास येताच मॉलच्‍या व्‍यवस्‍थापकाने राजापेठ पोलीस ठाण्‍यात या तरूणाच्‍या विरोधात तक्रार दाखल केली. त्‍या आधारे पोलिसांनी सैय्यद अवेन याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा…विवाह निमंत्रणपत्रिकेच्या बहाण्याने सायबर घोटाळा; ‘एपीके फाइल’ने राज्यात अनेकांची फसवणूक झाल्याचे उघड

गेल्‍या काही दिवसांपासून मॉलमधील स्‍वच्‍छतागृहात सायंकाळच्‍या वेळी एक तरूण बाटलीत पेट्रोल घेऊन येतो. पेट्रोल ओतल्‍यानंतर आगीचा भडका उडतो. त्‍यामुळे स्‍वच्‍छतागृहात गेलेला तरूण ओरडतो आणि पळत बाहेर येतो, असा व्‍हीडिओ तयार झाल्‍याचे निदर्शनास आले होते. त्‍याचप्रकारे कमोडवर बसलेली व्‍यक्‍ती अचानक काहीतरी पेटल्‍यामुळे बाहेर धावत येत असल्‍याचे किंवा एक व्‍यक्‍ती स्‍वच्‍छतागृहात असताना एक रॉकेट बाहेरून आतमध्‍ये सोडायचे. त्‍यामुळे आतमधील व्‍यक्‍ती घाबरून बाहेर पळत असल्‍याचे अनेक प्रँक व्‍हीडिओ आरोपी तरूणाने तयार केले होते. हे व्‍हीडिओ समाज माध्‍यमांवर प्रसारीत झाले होते.

हेही वाचा…अमरावती : नवनीत राणा म्‍हणतात, “…तर रवी राणा देखील राजीनामा देतील”

वास्‍तविक ज्‍वालाग्राही पदार्थ मॉलमध्‍ये नेण्‍यास बंदी असतानाही या तरूणाने ते आतमध्‍ये नेऊन प्रँक करण्‍याचे हे प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होते. या खोडसाळपणातून अनेकांच्‍या जिवाला धोका निर्माण झाला होता. हे व्‍हीडिओ बडनेरा मार्गावरील मॉलमध्‍ये चित्रित झाल्‍याचे निदर्शनास आल्‍यानंतर मॉलच्‍या व्‍यवस्‍थापकाने पोलिसांकडे धाव घेतली.मॉलमध्‍ये प्रवेशद्वारावरच वाहनांची तपासणी केली जाते. कोणीही ज्‍वालाग्राही पदार्थ आतमध्‍ये नेऊ शकत नाही. प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षक अंगझडती घेतात, असे असतानाही सैय्यद अवेन हा मॉलमध्‍ये पेट्रोल किंवा रॉकेट घेऊन पोहचला कसा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.