अकोला : राज्यात रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये पणन महासंघाकडून ज्वारी खरेदी केली जात आहे. यामध्ये अमरावती व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे ज्वारी खरेदी झाली नसल्याने त्या जिल्ह्यांच्या उद्दिष्टांना कात्री लावली. ते उद्दिष्ट अकोल्यासह पाच जिल्ह्यांमध्ये विभागून देण्यात आले आहे.

अकोला जिल्ह्याला सर्वाधिक १५ हजार क्विंटलचे उद्दिष्ट वाढवून दिले. ३० सप्टेंबरपर्यंत ज्वारी खरेदीला पणन महासंघाने मुदतवाढही दिली आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत रब्बी पणन हंगाम २०२३-२४ मध्ये ज्वारी खरेदी करण्यासाठी पणन महासंघाची मुख्य अभिकर्ता संस्था म्हणून नेमणूक झाली. शासनाकडून ज्वारी खरेदीचे पणन महासंघास नऊ लाख पाच हजार क्विंटलचे उद्दिष्ट दिले. त्यानुसार जिल्हा विपणन अधिकाऱ्यांना शेतकरी नोंदणी व खरेदीच्या प्रमाणात ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट विभागून देण्यात आले आहे. हंगामात ज्वारी खरेदीची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत असून मुदतीमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून प्राप्त उद्दिष्ट ११ जिल्ह्यांमध्ये विभागून देण्यात आलेले आहे. मात्र, अमरावती व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ज्वारी खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. उद्दिष्टपूर्ती होण्याच्या दृष्टीने दोन्ही जिल्ह्यांत ज्वारी खरेदी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यांच्या विपणन अधिकाऱ्यांनी पणन महासंघाकडे उद्दिष्टपूर्ती होणार नसल्याचे कळवले. त्यानुसार अमरावती व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांचे शिल्लक ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट अकोल्यासह पाच जिल्ह्यांमध्ये विभागून देण्यात आले आहे.

हेही वाचा – अमित शहा नागपुरात, गडकरी काश्मिरमध्ये, तर्कवितर्कांना ऊत

अमरावतीचे ३५ हजार, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे अडीच हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट घटविण्यात आले. त्या ३७ हजार ५०० क्विंटल उद्दिष्टाची विभागणी पाच जिल्ह्यांमध्ये करण्यात आली. त्यामध्ये अकोला जिल्ह्याला सर्वाधिक १५ हजार क्विंटल, बुलढाणा जिल्ह्याला १२ हजार, वाशीम पाच हजार, यवतमाळ तीन हजार, तर अडीच हजार क्विंटल बीड जिल्ह्याचे उद्दिष्ट वाढवले आहे.

७.९४ लाख क्विंटल ज्वारीची खरेदी

राज्यात नऊ लाख पाच हजार क्विंटलचे ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ११ जिल्ह्यांमध्ये सात लाख ९४ हजार १६९.२६ क्विंटल ज्वारीची खरेदी पूर्ण करण्यात आली.

हेही वाचा – काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना लोकसभा निवडणुकीपासून वंचित ठेवणारा निर्णय अवैध

उद्दिष्ट वाढविण्यासाठी पत्र

अकोला जिल्ह्यातील ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी अन्न, पुरवठा मंत्रालयाच्या सचिवांना ६ सप्टेंबरला पत्र दिले होते. त्यानंतर २० सप्टेंबरला पणन महासंघाच्या पत्रानुसार उद्दिष्ट वाढवले आहे.