अमरावतीत : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केवळ चमकोगिरीसाठी मुंबईहून अमरावतीत येऊन बेताल वक्तव्ये करू नयेत आणि अमरावतीत जिल्ह्याचे नाव निष्कारण बदनाम करू नये, आपल्या देशात बांगलादेशी सहजरित्या प्रवेश करू शकतात, या त्यांच्या दाव्यातून ते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना निष्क्रिय ठरवित आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी अमरावती येथे येऊन अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये हजारो बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म दाखल्यांचे वाटप केले असल्याचे प्रशासनावर अतिशय गंभीर व खळबळजनक असे आरोप केले. तसेच हे एक मोठे रॅकेट असल्याचे सुद्धा आरोप केले. जिल्हाधिकारी सारख्या उच्च अधिकाऱ्यावर चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वीच दोषारोपण करून त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी आततायी मागणी केली होती. या प्रकरणाची आणि आरोपाची संवेदनशीलता बघता जिल्हा प्रशासनाने अत्यंत तातडीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता या हजारो प्रकरणांपैकी केवळ तीन दाखले सदोष असल्याचे निष्पन्न झालेले आहे. जिल्हा प्रशासनाच्या या दाव्यामुळे किरीट सोमय्या यांची आरडाओरड केवळ तथ्यहीन नव्हे तर भंपक आणि केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केलेली असल्याचे आता निष्पन्न होत आहे, असे डॉ. सुनील देशमुख यांनी सांगितले.

याआधी सुद्धा त्यांनी अनेक राजकीय नेत्यांवर अनेक घोटाळ्यांचे आरोप करून असाच धडाका उडून दिला होता परंतु कालांतराने त्याच नेत्यांना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने पक्षात प्रवेश देऊन एक प्रकारे ‘वॉशिंग मशीन’ मध्ये टाकून पावन करून घेतल्याचे सर्वश्रुत आहे. केवळ प्रसिद्धीसाठी आणि समाजातील एका विशिष्ट घटकाला सातत्याने लक्ष्य करत राहण्याच्या भूमिकेतून आणि त्याद्वारे मतांचे ध्रुवीकरणकरण्याची त्यांची ही पद्धत सपशेल उघडी पडली आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणांमध्ये निष्कारण अमरावती जिल्ह्याची बदनामी होत असून यामुळे भविष्यात उद्योग व व्यवसायात जिल्ह्याची पीछेहाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनीच केलेल्या दाव्यानुसार जर अशा पद्धतीचे अन्य देशातील घुसखोर निरलसपणे आणि अत्यंत सहजासहजी भारत देशात प्रवेशित करून भारताच्या कानाकोपऱ्यात जर पोहोचत असतील तर हे देशाच्या गृह मंत्र्यांचे व संरक्षण मंत्र्यांचे मोठे अपयश असून आपल्याच देशाच्या गृह, संरक्षण मंत्र्यांना ते निष्क्रिय ठरवत आहेत, अशी टीका डॉ. सुनील देशमुख यांनी केली आहे.

Story img Loader