अमरावती : अमरावतीच्‍या काँग्रेसच्‍या आमदार सुलभा खोडके यांच्‍यावर पक्षविरोधी कारवाया केल्‍याचा ठपका ठेवून त्‍यांना पक्षातून निलंबित करण्‍यात आल्‍यानंतर प्रथमच प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली असून येत्‍या दोन ते तीन दिवसांत भूमिका जाहीर करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काँग्रेस मध्ये प्रवेश केला. सोनिया गांधी यांनी आपल्याला उमेदवारी दिली, पक्षाच्या तिकिटावर व पंजा या चिन्हावर २०१४ मध्ये बडनेरा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती, तसेच वर्ष २०१९ ला पुन्हा काँग्रेस पक्षाकडूनच अमरावती मतदार संघातून निवडणूक लढवीत विजयी झाले. प्रतिस्पर्धी उमेदवाराचा तब्बल २० हजार मतांनी पराभव केला. काँग्रेस पक्षाने दोनवेळा उमेदवारी दिल्या बद्दल सोनिया गांधी व इतर जेष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त करते. गेल्या पाच वर्षांपासून मी काँग्रेस पक्षाचीच आमदार म्हणून कार्यरत आहे. कधीही काँग्रेस पक्षाची लोकशाही व धर्मनिरपेक्ष विचारधारा सोडलेली नाही. काँग्रेस पक्षाने दोन वेळा उमेदवारी देऊन काम करण्याची संधी दिल्या बद्द्दल मी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व खासदार राहुल गांधी तसेच इतर वरिष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त करीत आहे. माझी भूमिका मी येत्या दोन -तीन दिवसात जाहीर करणार आहे, असे सुलभा खोडके यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा…प्रवीण तोगडिया म्हणतात, ‘संघासोबत काही मुद्यावर मतभेद मात्र…’

सुलभा खोडके यांनी गेल्‍या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांचा पराभव केला होता. दरम्‍यान, सुलभा खोडके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसच्‍या नेत्‍यांवर टीका केली होती. रमेश चेन्‍नीथला हे अमरावतीच्‍या भेटीवर असताना आयोजित कार्यक्रमांमध्‍ये आमदार म्‍हणून आपल्‍याला सन्‍मान देण्‍यात आला नाही. स्‍थानिक नेत्‍यांनी आपला अनेकवेळा अपमान केला, असा आरोप सुलभा खोडके यांनी केला होता. सुलभा खोडके या राष्‍ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे. उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या उपस्थितीत रविवारी अमरावतीत संत गाडगेबाबा समाधी मंदीराच्‍या प्रांगणात जनसन्‍मान यात्रा आणि मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते, पण राष्‍ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल मुंबईत हत्‍या करण्‍यात आल्‍यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्‍यात आले. या मेळाव्‍याला आपण उपस्थित राहणार असल्‍याचे सुलभा खोडके यांनी स्‍पष्‍ट केले होते.