अमरावती : युगुलांना अश्लील चाळे करण्यासाठी ३०० रुपये तासाप्रमाणे केबिन उपलब्ध करून देणाऱ्या कठोरा मार्गावरील एका कॅफेवर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने छापा टाकला. या कारवाईत कॅफेमालकासह एका कामगाराला ताब्यात घेण्यात आले.
कठोरा मार्गावरील फ्रोझन डिलाईट कॅफेमध्ये प्रेमीयुगुलांना तासाप्रमाणे पैसे आकारून अश्लील कृत्य करण्याकरिता केबिन उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाली. या माहितीच्या आधारावर साहाय्यक पोलीस निरीक्षक महेशकुमार इंगोले व त्यांच्या पथकाने या कॅफेवर छापा टाकला. त्यावेळी कॅफेमध्ये तयार करण्यात आलेल्या केबिनमध्ये काही तरुण-तरुणी हे अश्लील कृत्य करीत असताना दिसून आले.
त्यामुळे कॅफेमालक दीप किशोरराव चितोंडे (२८) रा. पोटे टॉउनशिप व तेथे काम करणारा प्रेम संदीप थोरात (१९) रा. विलासनगर दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात कारवाई करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलीस निरीक्षक महेशकुमार इंगोले, पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, मंगेश शिंदे, संग्राम भोजने, नईम बेग, चेतन कराडे, योगेश पवार, नीलेश वंजारी, सागर ठाकरे, राजीक रायलीवाले, वर्षा घोंगडे, संदीप खंडारे यांनी केली.
शहरात कॅफेच्या नावाखाली युवा पिढीला वाममार्गावर जाण्यासाठी प्रोत्साहित केले जात असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन कॅफेमधून शहर पोलिसांच्या दामिनी व भरोसा पथकाने सात १४ तरुण-तरुणींना ताब्यात घेतले होते. त्या चौदाही जणांना राजापेठ पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई आणि कायदेशीर समज देण्यात आली. याच वेळी दोन्ही कॅफेचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. काही दिवसांआधी राजापेठ भुयारी मार्गाजवळ एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गळा चिरून तिला गंभीर जखमी करण्यात आले. या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांच्या दामिनी व भरोसा पथकाने शहरातील काही कॅफेमधील ‘केबिन’च्या आतमध्ये नजर टाकून कारवाई केली आहे.
पोलिसांकडून अशा कॅफेंवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील अनेक भागांमध्ये अशा पद्धतीने कॅफे उघडून तरुण तरुणींना आकर्षित केले जात होते. आता पोलिसांनी पथके तयार करून संबंधित कॅफेंवर कारवाई सुरू केली आहे.