अमरावती : स्थानिक वसंत चौक परिसरातील एका पान मटेरियल विक्रीच्या दुकानात देशी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. दुकानातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. ही खळबळजनक घटना शुक्रवार, ४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने शहरातील अत्यंत गजबजलेल्या बाजारपेठेत एकच खळबळ उडाली. या प्रकरणी अज्ञात तीन हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.
वसंत टॉकीज परिसरात विक्की मंगलानी यांचे जय भोले केंद्र नामक पानमटेरियल विक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांचे भाऊ सागर मंगलानी व एक कर्मचारी दुकानात होते. त्यावेळी तीन हल्लेखोर अचानक दुकानात शिरले. विक्की कुठे आहे, अशी विचारणा त्यांनी सागर यांना केली. सागर हे त्यांच्याशीब् बोलत असतानाच हल्लेखोरांपैकी एकाने जवळील देशी कट्ट्याने दुकानात एक राउंड फायर केला. त्यानंतर हल्लेखोरांनी दुकानातील साहित्याची तोडफोड करून तेथून पळ काढला.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. तातडीने घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, साहाय्यक आयुक्त शिवाजी बचाटे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार, विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली. या प्रकरणी सागर मंगलानी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात तीन हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.