अमरावती : सहा महिन्‍यांपूर्वी झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पश्चिम विदर्भातील तीस विधानसभा मतदारसंघांपैकी १६ जागांवर मताधिक्‍य मिळाले होते, त्‍यापैकी केवळ चार जागा महाविकास आघाडीला राखता आल्‍या आहेत. पश्चिम विदर्भातील ३० जागांपैकी भाजपला १७, शिवसेना शिंदे गटाला २, राष्‍ट्रवादी अजित पवार गटाला ३ आणि युवा स्‍वाभिमान पक्ष १, अशा एकूण २३ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. दुसरीकडे काँग्रेसला ३ आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला ४, अशा केवळ सात जागा महाविकास आघाडीला मिळाल्‍या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीत पश्चिम विदर्भात महाविकास आघाडीला दोन आणि महायुतीला दोन जागा असे संमीश्र यश मिळाले होते. तरीही महाविकास आघाडीचा विधानसभा मतदारसंघांवर वरचष्‍मा दिसून आला होता. एकूण तीस जागांपैकी महाविकास आघाडीला तब्‍बल १६ जागांवर मताधिक्‍य मिळाले होते. त्‍यात अमरावती आणि यवतमाळ जिल्‍ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता.

हेही वाचा – लोकसभेला ईव्हीएममध्ये दोष नव्हता का? बावनकुळेंचा विरोधकांना सवाल

अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखडे हे निवडून आले होते. त्‍यांना दर्यापूर, अमरावती, तिवसा आणि अचलपूर या चार मतदारसंघांमध्‍ये मताधिक्‍य मिळाले होते. पण, यावेळी दर्यापूर वगळता इतर तीन ठिकाणी महाविकास आघाडीचा पराभव झाला. जिल्‍ह्यातील धामणगाव आणि मोर्शी हे दोन मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघाशी जोडले आहेत. धामणगावात महाविकास आघाडीला मताधिक्‍य मिळूनही ही जागा भाजपने जिंकली आणि काँग्रेसच्‍या उमेदवाराचा पराभव झाला.

यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख निवडून आले. महाविकास आघाडीला जिल्‍ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात मताधिक्‍य मिळाले होते, पण यावेळी केवळ यवतमाळ आणि वणी या दोनच ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळाले. आर्णी, उमरखेड, राळेगाव, दिग्रस या ठिकाणी लोकसभेत मताधिक्‍य मिळूनही महाविकास आघाडीचा या जागी पराभव झाला.

हेही वाचा – फडणवीसांचा मुक्काम ‘रामगिरी’ला की ‘देवगिरी’ला ?

लोकसभा निवडणुकीत बुलढाणा आणि चिखलीमध्‍ये महाविकास आघाडीला मताधिक्‍य मिळूनही या जागांवर विधानसभेत महाविकास आघाडीचा पराभव झाला. अकोला जिल्‍ह्यातील अकोला पश्चिमची जागा महाविकास आघाडीने राखली. वाशीम, कारंजा या दोन विधानसभा मतदारसंघांमध्‍ये लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मताधिक्‍य मिळूनही यावेळी मात्र या दोन्‍ही जागा महायुतीने हिसकावून घेतल्‍या. गेल्‍या विधानसभा निवडणुकीत भाजप १५, काँग्रेस ५, शिवसेना ४, राष्‍ट्रवादी २, प्रहार २, अपक्ष १ आणि स्‍वाभिमानी शेतकरी संघटना १ असे पक्षीय बलाबल होते. पक्षांच्‍या फुटीनंतर भाजपचे संख्‍याबळ १७ पर्यंत पोहचले आहे.