अमरावती : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा म्‍हणजेच इयत्‍ता बारावीचा अमरावती विभागाचा निकाल ९३.०० टक्के लागला असून उत्तीर्णतेच्या टक्केवारीत नऊ विभागीय मंडळांमध्ये अमरावती विभाग सातव्‍या स्थानी आहे. गेल्‍या वर्षी अमरावती विभागाचा निकाल ९२.७५ टक्‍के लागला होता, यंदा त्‍यात ०.२५ टक्‍क्‍यांची वाढ झाली असली, तरी क्रमवारीत चौथ्‍या क्रमांकावरून सातव्‍या स्‍थानी घसरण झाली आहे.

निकालाच्‍या टक्‍केवारीत विभागात वाशीम जिल्‍ह्याने अव्‍वल स्‍थान मिळवले असून या जिल्‍ह्याचा निकाल ९५.६९ टक्‍के, अकोला ९३.३७, यवतमाळ ९३.०५, अमरावती ९२.३३, बुलढाणा ९१.७८ टक्‍के लागला आहे. मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी अमरावती विभागातून एकूण १ लाख ४३ हजार ७६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात १ लाख ४२ हजार ८३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण १ लाख ३२ हजार ८४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.०० इतकी आहे.

हेही वाचा – ‘श्रीं’ची पालखी १३ जूनला पंढरपूरला होणार रवाना; ३३ दिवसांची पायदळ वारी

अमरावती विभागाचा विज्ञान शाखेचा निकाल ९७.९८ टक्‍के, कला शाखेचा ८६.८७ टक्‍के, वाणिज्‍य शाखेचा ९२.८३ टक्‍के तर व्‍यवसाय अभ्‍यासक्रमाचा निकाल ८८.२२ टक्‍के इतका लागला आहे. उत्‍तीर्णतेच्‍या बाबतीत यंदा देखील मुलींनीच बाजी मारली आहे. अमरावती विभागातून एकूण ६५ हजार ७०० मुलींनी परीक्षा दिली, त्‍यापैकी ६२ हजार ४४८ विद्यार्थिनी उत्‍तीर्ण झाल्‍या. हे प्रमाण ९५.०५ टक्‍के आहे, तर ७७ हजार १३६ मुलांनी परीक्षा दिली, त्‍यापैकी ७० हजार ३९२ मुले उत्‍तीर्ण झाले. मुलांच्‍या उत्‍तीर्णतेची टक्‍केवारी ही  ९१.२५ इतकी आहे.

परीक्षेला प्रविष्‍ट झालेल्‍या सर्व विद्यार्थ्‍यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्‍या संकेतस्‍थळांवरून उपलब्‍ध होतील. या माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल. त्‍याचप्रमाणे डीजीलॉकर अॅप मध्‍ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्‍याची सोय उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. संबंधित संकेतस्‍थळावर कनिष्‍ठ महाविद्यालयांसाठी एकत्रित निकाल उपलब्‍ध असून विद्यार्थ्‍यांच्‍या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे.

हेही वाचा – आरटीईसाठी बनावट कागदपत्र प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक, हजारांवर पालकांवर होणार गुन्हे दाखल

ऑनलाईन निकालानंतर उच्‍च माध्‍यमिक प्रमाणतपत्र परीक्षेस प्रविष्‍ट झालेल्‍या विद्यार्थ्‍यास स्‍वत:च्‍या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्‍यतिरिक्‍त) कोणत्‍याही विशिष्‍ट विषयात त्‍याने संपादित केलेल्‍या गुणांची गुणपडताळणी आणि उत्‍तरपत्रिकांच्‍या छायाप्रती, पुनर्मूल्‍यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्‍या अधिकृत संकेतस्‍थळवारून स्‍वत: किंवा कनिष्‍ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्‍याची सोय उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. गुणपडताळणीसाठी आणि उत्‍तरपत्रिका छायाप्रतीसाठी बुधवारी २२ मे ते ५ जून २०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.

Story img Loader