अमरावती : हवामान खात्याच्या अंदाजानुसार २७ आणि २८ डिसेंबर दरम्यान विदर्भात मेघ गर्जनेसह वादळी वाऱ्यांचा पाऊस तसेच थंडीची लाट येणार असल्याचे वर्तविण्यात आले आहे. त्यानुषंगाने प्रतिकुल हवामानापासून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विभागातील सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी सतर्क राहून उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्ह्यात कुठेही आपातकालीन स्थिती उद्भल्यास त्याठिकाणी तत्काळ मदत व बचाव दल पोहचेल यादृष्टीने नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, हवामान खात्याकडून वादळी वाऱ्यांसह पाऊस व थंडीची लाट विदर्भात सर्वत्र येणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी थंडीच्या लाटेपासून बचावासाठी उपाययोजना कराव्यात.

वादळी पावसामुळे झाडांचे नुकसान किंवा मोठी झाडे उन्मळून पडणे, फांद्या तुटणे यासाठी व वाहतुकीचा रस्ता पूर्ववत सुरु करण्यासाठी अग्निशमन विभागाचे पथक तयार ठेवावे. अवकाळी पाऊस तसेच थंडीची लाट, नैसर्गिक वीज यामुळे होणारी जिवीत हानी टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यांमुळे वीज खंडीत झाल्यास वीज वितरण कंपनीच्या यंत्रणांना सज्ज ठेवावे. वीज पुरवठा खंडीत झाल्यास त्याठिकाणी पथक पाठविण्यात यावे. जिल्हा शोध व बचाव पथके सर्व सोयी-सुविधांनिशी व बचाव साहित्यांसह २४ तास सज्ज ठेवावीत. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष २४ x ७ कार्यान्वित ठेवावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

हेही वाचा : नदीजोड प्रकल्पातून महाराष्ट्राचा कायापालट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

२७ डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम उत्तर महाराष्ट्र , दक्षिण मराठवाडा या भागात होईल. शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल, ज्यात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. २८ डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. यात यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे. ३० डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल.

Story img Loader