अमरावती : २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील विविध सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात येत आहे. मात्र निवडणुकीचे काम करण्यास उत्सुक नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून विविध कारणे दाखवून ड्युटी रद्द करण्यासाठी अर्ज केले जात आहेत. काहींना हृदयविकाराचा त्रास, उच्च रक्तदाब, मधुमेह शरीरातील विविध अंग दुखण्याचे आजार आहेत. ड्युटी रद्द करण्यासाठी जिल्ह्यातील ८२० कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे. याबाबतचे विनंती अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले. या अर्जाची पडताळणी करूनच कर्मचाऱ्यांचे निवडणुकीचे काम रद्द होणार की – नाही हे ठरणार आहे. ड्युटी रद्द करण्यासाठी आजार तसेच अन्य कौटुंबिक कारणे सांगण्यात आली आहेत.
धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर आणि मोर्शी या आठ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ ला विधानसभानिहाय मतमोजणी होणार आहे. मतमोजणी आणि मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची गरज मोठ्या प्रमाणात असल्याने आठही मतदारसंघात २,७०८ केंद्रांवर १२ हजार ८७४ कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत २२ हजार ८०८ कर्मचाऱ्यांची नोंदणी करत त्यांना आदेश देखील जारी केले आहे. यामध्ये मतदान केंद्राध्यक्षांसह प्रथम मतदान अधिकारी व अन्य मतदान अधिकारी या कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे शनिवार आणि रविवारी पहिले प्रशिक्षण पार पडले. दरम्यान आजार व इतर कौटुंबिक कारणांमुळे यातील सुमारे ८२० कर्मचाऱ्यांनी मात्र कर्तव्य बजावण्याला नकार दिला आहे. विनंती अर्ज घेऊन शेकडो कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी उसळली होती. ८२० कर्मचाऱ्यांचे अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेत. यामध्ये २८० केंद्राध्यक्ष, १८९ प्रथम मतदान अधिकारी व ३५० इतर मतदान अधिकारी यांचा समावेश आहे.
हेही वाचा – नागपूर : अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी ‘स्निफर डॉग’ तैनात
हेही वाचा – निवडणुकीत तेली समाजाचे पक्षीय प्रतिनिधित्व, काही ठिकाणी तर तेली विरुद्ध तेलीच
निवडणुकीचे काम रद्द करण्यासाठी कर्मचारी वेगवेगळी कारणे सांगतात. त्यामध्ये, चालताना धाप लागते, अतिश्रमाने चक्कर येते, हृदयाची शस्त्रक्रिया झालीय, उच्च रक्तदाब आहे, वयस्कर आई-वडिलांची जबाबदारी आहे अशी अनेक कारणे सांगून सरकारी खात्यातील कर्मचारी व अधिकारी निवडणुकीची कामे टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपली ड्युटी रद्द व्हावी याकरता वशिले लावले जात आहेत. निवडणुकीचे काम रद्द होऊ शकते, मात्र दुर्धर आजार किंवा अन्य गंभीर कारणांसाठी पुरावा देणे गरजेचे आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.