अमरावती : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) काही दिवसांपुर्वी एका महिला रुग्णाने कर्तव्यावरील परिचारिकेवर धारदार वस्तूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात परिचारिका गंभीर जखमी झाल्या. त्यांचे नाक व जबडा फॅक्चर झाला. जखमी परिचारिका लता सिरसाट यांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन दोषीवर कारवाईची मागणी केली. दरम्यान महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने या घटनेची गंभीर दखल घेतली असून तीव्र निषेध नोंदविला आहे. कर्तव्यावर कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी घेण्याबाबत तसेच आवश्यक उपाययोजना तात्काळ करण्याबाबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल वासनिक व सदस्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना निवेदन सादर केले आहे.
काही दिवसांपुर्वी ३५ वर्षीय महिला शनिवार दुपारपासून महिला रुग्णांच्या वॉर्ड क्रमांक २ मध्ये दाखल होती आणि तिच्यावर उपचार सुरू होते. रात्रीच्या शिफ्टमध्ये परिचारिका लता सिरसाट कर्तव्यावर होत्या. त्यावेळी या महिला रुग्णाने त्यांच्या उपचाराबद्दल विचारणा केली. सिरसाट यांनी उपचार सुरू असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर या महिला रुग्णाने पुन्हा वाद घातला आणि कथितरित्या मारहाण करत धारदार वस्तूने त्यांच्या चेहऱ्यावर वार केले. लता सिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात त्यांचा जबडाही फ्रॅक्चर झाला असून, त्यांचा सीटी स्कॅन करण्यात असून शहर कोतवाली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली. या घटनेनंतर परिचारिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आरोग्य कर्मचारी रुग्णांच्या सेवेत असताना त्यांच्यावर हल्ला होण्याचे अनेक प्रकार यापुर्वी घडले आहेत. अशा घटना रोखण्यासाठी सरकारने तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या घटनेमुळे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने राज्यभरातील परिचारिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत आणि संघटनेने परिचारिकांच्या सुरक्षेसाठी आवाज उठवला आहे, कोलकात्यातील घटनेनंतर संघटनेने ‘ब्लॅक रिबन’ आंदोलन केले होते. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून काही लोकांनी नियमबाह्य तक्रार केल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने परिचारिकांना निलंबित केले होते, ही घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे. अशा घटनांमुळे रुग्णसेवा देणाऱ्या परिचारिकांचे मनोधैर्य खचत आहे आणि त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे, असे संघटनेने म्हटले आहे. परिचारिकांना कामाच्या स्थळी सुरक्षित वातावरण आणि संरक्षण मिळावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.