अमरावती : विद्यार्थी आणि पालकांसाठी बहुप्रतीक्षित अकरावी केंद्रीय प्रवेशाची गुणवत्‍ता यादी गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्‍यात आली असून प्रथम गुणवत्‍ता यादीत ४ हजार ९७८ विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्‍यांना १ जुलैपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांमध्‍ये प्रवेश घ्‍यावयाचे आहेत, अशी माहिती केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समन्‍वयक प्रा. अरविंद मंगळे यांनी दिली आहे.

अमरावती महापालिका क्षेत्रातील विविध कनिष्‍ठ महाविद्यालयांमध्‍ये प्रवेशाच्‍या एकूण १६ हजार १६० जागा असून यंदा ९ हजार ९३५ विद्यार्थ्‍यांनी नोंदणी केली आहे. त्‍यामुळे यंदा देखील मोठ्या प्रमाणावर जागा रिक्‍त राहण्‍याची शक्‍यता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावतीतील नामांकित महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण हे ८५ पार गेले आहेत. पहिल्‍या प्रवेश यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्‍या विद्यार्थ्‍यांना २७ जून ते १ जुलै या कालावधीत मिळालेल्‍या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा आहे.

हेही वाचा – पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी आता ‘सहकार’, जाणून घ्या केंद्रीय सहकार विभागाचा निर्णय

अमरावतीत अकरावी प्रवेशासाठी २४ मेपासून नोंदणी सुरू झाली. ५ जूनपासून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पसंती दर्शवणारा अर्ज क्रमांक २ भरण्यास सुरुवात झाली. ज्‍या विद्यार्थ्‍यांनी इनहाऊस कोटा किंवा अल्‍पसंख्‍यांक कोटा प्रवेशासाठी नोंदणी केली आहे, अशा विद्यार्थ्‍यांची गुणवत्‍ता यादी कनिष्‍ठ महाविद्यालय स्‍तरावर १८ जून रोजी प्रसिद्ध करण्‍यात आली.

अमरावती शहरातील ६८ कनिष्‍ठ महाविद्यालयांत विज्ञान शाखेच्‍या सर्वाधिक ७ हजार ३००, कला शाखेच्‍या ३ हजार ५९०, वाणिज्‍य शाखेच्‍या २ हजार ८९०, एचएससी व्‍होकेशनलच्‍या २ हजार ३७० अशा एकूण १६ हजार १६० जागा उपलब्‍ध आहेत.

२१ जूनपर्यंत इनहाऊस आणि अल्‍पसंख्‍यांक कोटाअंतर्गत ७९३ प्रवेश विविध शाखांमध्‍ये झालेले आहेत. प्रथम गुणवत्‍ता यादीत एकूण ४ हजार ९७८ विद्यार्थ्‍यांची नावे आहेत. कला शाखेची प्रवेश क्षमता ही ३ हजार ५९० इतकी असताना इनहाऊस व अल्‍पसंख्‍यांक कोटाअंतर्गत ११५ विद्यार्थ्‍यांचे प्रवेश झाले आहेत. गुणवत्‍ता यादीनुसार ७७० विद्यार्थ्‍यांना प्रवेश मिळू शकणार आहे. वाणिज्‍य शाखेच्‍या २ हजार ८९० जागांपैकी १४५ जागांवर इनहाऊस, अल्‍पसंख्‍यांक कोटाअंतर्गत प्रवेश झाले असून ७१० विद्यार्थ्‍यांना गुणवत्‍ता यादीनुसार प्रवेश मिळणार आहे.

हेही वाचा – बुलढाणा : भक्ती महामार्गाविरोधात आंदोलन पेटले; ४६ गावातील ग्रामस्थ रस्त्यावर

विज्ञान शाखेच्‍या एकूण ७ हजार ३०० जागांपैकी इनहाऊस, अल्‍पसंख्‍यांक कोटाअंतर्गत ५३० प्रवेश झाले आहेत, तर गुणवत्‍ता यादीनुसार प्रवेशार्थी विद्यार्थीसंख्‍या ही ३ हजार ४५८ इतकी आहे. एचएससी व्‍होकेशनल अभ्‍यासक्रमाकडे मात्र कल कमी आहे. २ हजार ३७० प्रवेश क्षमता असताना या अभ्‍याक्रमात इनहाऊस, अल्‍पसंख्‍यांक कोटाअंतर्गत केवळ ३ विद्यार्थ्‍यांनी प्रवेश घेतला आहे, तर ४० प्रवेशार्थी विद्यार्थी आहेत. सर्व शाखांमध्‍ये पुरेशा जागा उपलब्‍ध असल्‍याने आणि रिक्‍त जागा असल्याने दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्‍यांनी पसंतीक्रम भरावेत, असे आवाहन करण्‍यात आले आहे.