अमरावती : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांनी गुरुवारी नागपुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच त्यांच्यावर अमरावती लोकसभा संयोजकपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने भाजप वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वानखडे हे शिवसेनेचे अमरावती जिल्हाप्रमुख होते आणि त्यांच्याकडे तिवसा, अचलपूर आणि मेळघाट विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमरावती जिल्ह्याकडे कायम दुर्लक्ष केल्याने आपण शिवसेना सोडत असल्याचे वानखडे यांनी सांगितले होते. दरम्यान, वानखडे यांनी गुरुवारी नागपुरात भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तत्काळ त्यांची नियुक्ती भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी करण्यात आली. सामाजिक कार्य आणि राजकीय क्षेत्रातील आपला अनुभव लक्षात घेता, आगामी काळात आपल्याकडे अमरावती लोकसभा संयोजक पदाची जबाबदारी देण्यात येत आहे. आपण आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम कराल, अशी अपेक्षा असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी वानखडे यांच्या नियुक्तीपत्रात नमूद केले आहे.
वानखडे हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तिवसा मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार होते. त्यांचा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी पराभव केला होता. भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांचा देखील परंपरागत मतदारसंघ तिवसा आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन नेत्यांमध्ये स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप कोणती व्यूहरचना आखणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. खा. नवनीत राणा या भाजपचे समर्थन मिळवतात की त्या भाजपमध्ये प्रवेश करतात, याचे औत्सुक्य असतानाच वानखडे यांच्यावर लोकसभा संयोजकपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.