अमरावती : भारतीय संस्कृतीत कुंकू लावण्याची प्रथा आहे. कपाळावर गंध, टिळा लावणे ही परंपरा स्त्री व पुरुष दोघांमध्येही सामान्य असली तरी कुंकू लावणे हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते. कुंकू तयार करणारे शहर म्‍हणून अमरावतीची खास ओळख आहे. अयोध्‍येतील बहुप्रतीक्षित राम मंदिरातील प्राणप्रतिष्‍ठेचा दिवस जवळ येऊन ठेपलेला असताना अमरावतीहून अयोध्‍येसाठी पाचशे किलो कुंकू पाठवले जाणार आहे. येथील ‘सकल हिंदू समाज’ने कुंकू पाठवण्‍याचा संकल्‍प केला असून उद्या १७ जानेवारी रोजी हे कुंकू अयोध्‍येसाठी रवाना होणार आहे, अशी माहिती केसरी धर्मसभेचे अध्‍यक्ष आणि माजी राज्‍यमंत्री जगदीश गुप्‍ता यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगदीश गुप्‍ता म्‍हणाले, अयोध्‍येतील प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यासाठी अंबानगरीची खास ओळख असलेले ५०० किलो कुंकू पाठवण्याचे आम्ही ठरवले आहे. कौंडण्यपूर येथील रुक्मिणी पीठाचे पीठाधीश्वर श्री राजराजेश्वर माउली सरकार हे त्यांच्यासोबत प्रतीकात्मक कलशात कुंकू सोबत नेतील. उर्वरित कुंकू रुक्मिणी पीठाचे सेवक अयोध्येत पोहोचवतील. श्री राजराजेश्वर माउली सरकार यांचा अभिवादन सोहळा १७ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता राजकमल चौकात आयोजित करण्‍यात आला आहे. या सोहळ्याच्या एक दिवस आधीपासून कुंकू गोळा केले जाणार आहे. या कुंकवातील कलशभर कुंकू माउली सरकारच्या स्वाधीन केले जाणार आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची स्त्री संवाद यात्रा उद्या रामटेकमध्ये, रश्मी ठाकरे करणार मार्गदर्शन

श्री राजराजेश्वर माउली यांना २२ जानेवारी रोजी अयोध्‍येत होत असलेल्‍या प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित करण्‍यात आले आहे. त्‍या निमित्‍ताने १७ जानेवारीला अमरावतीत कुंकू अर्पण सोहळा आयोजित करण्‍यात आला आहे, असे जगदीश गुप्‍ता यांनी सांगितले.

हेही वाचा – जीवघेण्या प्रवेशातून होणार सुटका! यवतमाळ शहराबाहेर राष्ट्रीय महामार्गावर तीन उड्डाणपूल प्रस्तावित

हळदीबरोबर चिंचोका, रताळ्याची पावडर, टोपिओका, डोलामॅट यांपासून कुंकू बनवले जाते. अमरावतीत आता कुंकू तयार करणारे कारखाने बोटावर मोजण्‍याइतके शिल्‍लक असले, तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत येथील कुंकवाला मोठी मागणी होती. कुंकू बनवण्याचा कालखंड हा सप्टेंबर ते मे असा नऊ महिन्यांचा असतो. अमरावतीचे कुंकू आता या निमित्‍ताने अयोध्‍येला पोहोचणार आहे.