नागपूर : अमरावती जिल्ह्यातील पोहरा-मालखेड राखीव जंगल म्हणजे बिबट्यांचा हक्काचा अधिवास! याच जंगलात वाघ स्थलांतर करून आल्याच्या नोंदी आहेत. पण आता या जंगलाला लागून असणाऱ्या रस्त्यांनीच बिबट्यांचे जगणे कठीण केले आहे. या रस्त्यांवर माणसांनी हक्क गाजवायला सुरुवात केली आणि बिबट्यांना त्यांच्या अधिवासातून बाहेर पडणेही कठीण झाले. त्यांनी बाहेर पडायचा प्रयत्न केलाच तर रस्त्यावरील वाहनांनी त्यांना धडक देऊन थेट यमसदनी पाठवले.
पोहरा मालखेड राखीव जंगलाच्या चांदुर रेल्वे वनपरीक्षेत्राअंतर्गत चिरोडी गावाजवळ रस्ते अपघातात बिबट्याचा मृत्यू झाला. त्यामुळे जंगलालगतच्या रस्त्यावरील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यावरील उपाययोजनावर अनेकदा चर्चा होत असली तरीही त्यावर गांभीर्याने कृती केली जात नाही.
हेही वाचा : हे काय चाललेय नागपुरात? पंचनामा करायला गेलेल्या पोलिसावरच हल्ला….
उपाययोजना काय ?
रस्त्यावर वन्यप्राण्यांच्या होणाऱ्या अपघातांना रोखण्यासाठी काही उपाययोजना करण्यात येऊ शकतात. उड्डाणपूल, भुयारी मार्ग, बोगदे किंवा इतर मानवनिर्मित संरचनांच्या माध्यमातून प्राण्यांना रस्त्यांवरून न जाऊन मार्ग दाखवता येतो. यामुळे प्राणी-वाहन अपघात टाळता येतात आणि प्रजातींना त्यांच्या निवासस्थानातून सुरक्षित मार्ग मिळतो. वन्यजीव अपघात रोखण्यासाठी गती निरीक्षण प्रणालींचा वापर केला जातो. महामार्गांवर वन्यजीवांसाठी स्वतंत्र मार्ग असणे गरजेचे आहे. वन्यप्राण्यांसाठी अनुकूल उपशमन रचनांच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांच्या वापरावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
येथे नेहमी अपघात होतात..
या रस्ताने नेहमी असे अपघात होतात . खरेतर पोहरा-चिरोडी जंगल अतिशय समृद्ध आहे . मेळघाट पेक्षाही जास्त प्राणी घनता या जंगलात आहे . अमरावतीचे हे वैभव जपण्याची नितांत गरज आहे . चांदूर रेल्वे – मालखेड – कोंडेश्वर – अमरावती अशा पर्यायी रस्त्याची मागणी व्हायला हवी . हा रस्ता जंगलाबाहेरूनही जाईल आणि सरळ व कमी अंतराचाही होईल . आता किमान मागणी केली व ती लावून धरली तर येत्या चार – दोन वर्षात मार्गी लागेल.
हेही वाचा : बिबट्याने कोंबडी नाकारली पण, बकरी स्वीकारली…
रस्ता माणसांसाठीही धोकादायक..
तसेही पोहरा-चिरोडी रस्ता जंगलामुळे रुंदीकरण न करता आल्याने अरुंद व धोकादायक वळणाचा बनला आहे . भविष्यातही रुंदीकरण करणे अशक्य आहे व वाहतुक वाढतेच आहे . सबब पर्यायी रस्त्याची मागणी करणे योग्य राहील. मात्र, निसर्ग संवर्धन दृष्टीने उपाय चांगला असला तरीही २० किलोमीटरचा फेरा वाढतो. चांदूर रेल्वे ३० ऐवजी ५० किलोमीटरचा होईल. त्यामुळे व्यावहारिक दृष्ट्यालोक ते स्वीकारतील का हाही प्रश्न आहे.