अमरावती : काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना विजय मिळवून देण्‍यात अमरावती विधानसभा मतदार संघाचा वाटा मोलाचा ठरला. एकट्या अमरावतीमधून त्‍यांना ४१ हजार ६४८ मतांची निर्णायक आघाडी मिळाली. आमदार यशोमती ठाकूर यांची व्‍यूहनीती, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी राबविलेले नियोजनबद्ध प्रचारतंत्र यामुळे काँग्रेसला तब्‍बल २८ वर्षांनंतर पंजा चिन्‍हावर निवडणूक लढवून विजयश्री मिळवण्‍यात यश आले. काँग्रेसचा बालेकिल्‍ला राहिलेला अमरावती मतदार संघ १९९० च्‍या दशकात काँग्रेसच्‍या हातून निसटला. तो पर‍त मिळवण्‍यात अमरावतीसह तिवसा, दर्यापूर आणि अचलपूर मतदारसंघांनीही साथ दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती विधानसभा मतदार संघ हा संपूर्णपणे शहरी. ओबीसी, अल्‍पसंख्‍यांक, दलित मतदारांची संख्‍या लक्षणीय. हिंदी भाषकांचीही संख्‍या मोठी. अशा स्थितीत अमरावती विधानसभा मतदार संघातून १ लाख १४ हजार ७०२ मते बळवंत वानखडे यांना प्राप्‍त झाली. त्‍यांना एकट्या अमरावतीतून मिळालेले मताधिक्‍य हे ४१ हजार ६४८ इतके आहे. बळवंत वानखडे यांना स्‍वत:च्‍या दर्यापूर मतदारसंघातून ८७ हजार ८४३ मते आणि ८ हजार ६७१ इ‍तके मताधिक्‍य मिळू शकले. बळवंत वानखडे यांना चार विधानसभा मतदारसंघांमध्‍ये मताधिक्‍य मिळाले आहे. त्‍यात तिवसामधून १० हजार ५७६, अचलपूरमधून ६ हजार ७९३ इतक्‍या मतांच्‍या आघाडीचा देखील समावेश आहे.

हेही वाचा : धानोरकर यांच्या विजयात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आ.सुभाष धोटे यांची भूमिका महत्त्वाची, तिकीट मिळविण्याच्या संघर्षात…

गेल्‍या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्‍ट्रवादीच्‍या पाठिंब्‍यावर निवडून आलेल्‍या नवनीत राणा यांना अमरावती विधानसभा मतदारसंघातून तब्‍बल ९६ हजार ६४४ मते प्राप्‍त झाली होती. यावेळी त्‍यांना केवळ ७३ हजार ५४ मते मिळाली. ही पडझड काँग्रेसच्‍या नियोजनबद्ध प्रचाराचे फलित मानले जात आहे. अमरावतीत काँग्रेसच्‍या मागे उभा ठाकणारा मोठा मतदार वर्ग आहे, हे काँग्रेस नेत्‍यांना लक्षात आले होते. माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी या मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी घेतलेले परिश्रम फळाला आले. बळवंत वानखडे यांच्‍या पारड्यात पडलेली दलित, मुस्‍लीम आणि ओबीसींची मते ही त्‍यांना विजयापर्यंत पोहचवण्‍यात सहाय्यभूत ठरली.

हेही वाचा : छत्तीसगड सीमेवर पोलीस-नक्षल चकमक, स्फोटके नष्ट

१९९६ च्‍या निवडणुकीत काँग्रेसच्‍या अधिकृत पक्षचिन्‍हावर भाऊसाहेब भेले हे रिंगणात होते. ते पराभूत झाले. त्‍यानंतर काँग्रेसला पक्षचिन्‍हावर येथून निवडणूक लढविता आली नव्‍हती. यावेळी काँग्रेसलाच उमेदवारी मिळावी, यासाठी यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख आणि इतर काँग्रेसजनांनी घेतलेली मेहनत, निवडणुकीच्‍या प्रत्‍येक टप्‍प्‍यावर महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांनी दाखविलेली एकजूट यामुळे विजय मिळाला. आता काँग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांमध्‍ये नव्‍याने उत्‍साह संचारला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati lok sabha election result 2024 congress candidate balwant wankhede win navneet rana lost mma 73 css
Show comments