अमरावती : नवनीत राणा यांच्‍या उमेदवारीमुळे भाजपचा एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता नाराज नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला असला, तरी भाजपचे नेते आणि महापालिकेचे माजी स्‍थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी विरोधी सूर कायम ठेवला आहे. पक्षनिष्‍ठा हे आमचे भांडवल आहे, कमजोरी नव्‍हे. कुणीही यावे आणि टपली मारून जावे, इतके आम्‍ही कमकुवत नाही, असे तुषार भारतीय यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुषार भारतीय यांच्‍या विरोधाच्‍या पार्श्‍वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सायंकाळी तुषार भारतीय यांची भेट घेऊन त्‍यांची समजूत काढण्‍याचा प्रयत्‍न केला. भाजपने जाहीर केलेल्‍या उमेदवारीमुळे आम्‍ही नाराज नसून दु:खी आहोत. नाराजी दूर करता येईल, पण आम्‍हाला मनापासून झालेले दु:ख दूर करता येणार नाही, अशी स्‍पष्‍ट भूमिका तुषार भारतीय यांनी मांडली.

हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

नवनीत राणा यांच्‍या प्रचारासाठी सोमवारी आयोजित भाजपच्‍या संवाद बैठकीला तुषार भारतीय उपस्थित नव्‍हते. नवनीत राणा यांचे भाजपच्‍या कार्यालयात स्‍वागत करण्‍यात आले, त्‍यावेळीही त्‍यांनी उपस्थित राहण्‍याचे टाळले. ज्‍या मंचावर रवी राणा असतील, त्‍या ठिकाणी आपण उपस्थित राहणार नाही, असे भारतीय यांनी सांगितले.

भाजपला इतर पक्षांपेक्षा फार वेगळी परंपरा आहे. आमची निष्‍ठा ही पक्षासोबत आहे. ज्‍या भाजपच्‍या कार्यालयावर रवी राणांनी हल्‍ला केला, कार्यकर्त्‍यांना मारहाण केली. आम्‍ही ज्‍या कामांना मंजुरी मिळवून आणली, त्‍या कामांना थांबविण्‍याचा प्रयत्‍न केला. प्रत्‍येक कामाचे विनाकारण श्रेय घेण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यांच्‍याबद्दल आम्‍ही कशाच्‍या बळावर कळवळा दाखवू, असा प्रश्‍न तुषार भारतीय यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – बुलढाण्यात महायुतीत महाफूट, भाजप लोकसभा प्रमुखांचे बंड; उमेदवारी अर्ज दाखल

अमरावती जिल्‍ह्यात भाजपची पक्षसंघटना मजबूत करण्‍यासाठी अनेकांचे हातभार लागले आहे. तळागाळातील कार्यकर्त्‍यांपासून ते विद्यमान आमदारांपर्यंत सर्वांचे कसब पणाला लागले आहे. पण, भाजपच्‍या अब्रूची लक्‍तरे ज्‍यांनी वेशीवर टांगली, त्‍याच लोकांना पक्षाने उमेदवारी द्यावी, याचे दु:ख आहे. आमचे वरिष्‍ठांकडून ऐकून घेण्‍यात आले नाही, याचे दु:ख अधिक आहे. पक्षाच्‍या अनेक कार्यकर्त्‍यांच्‍या याच भावना आहेत, असे तुषार भारतीय यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा – “बच्चू कडूंचा भाजपशी थेट संबंध नाही, त्यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

भाजपच्‍या बैठकीला महायुतीतील घटक पक्षांची गैरहजेरी

नवनीत राणा यांच्या उमेदवारीला ११ पक्षांनी पाठिंबा दिल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. मात्र, त्यांच्या बैठकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटासह इतर नऊ पक्षांनी पाठ फिरवल्‍याचे चित्र दिसले. केवळ भाजप आणि युवा स्‍वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते संवाद बैठकीला उपस्थित होते. त्‍यामुळे घटक पक्षांची नाराजी अजून दूर झालेली नाही, हे दिसून आले. शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केल्याने इतर लहान पक्षांनीसुद्धा अमरावतीच्या उमेदवाराकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा सभागृहात होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati lok sabha party loyalty is our capital not weakness bjp leader tushar bharatiya tone against navneet rana mma 73 ssb
Show comments