अमरावती : शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार यावे. शेतकऱ्यांच्या हिताचे धोरणे व्हावीत. यासाठी आम्ही येत्या २९ ऑक्टोबरला अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहोत. शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांसाठी आर्थिक आरक्षण निर्माण व्हावे. यासाठी देखील आमची लढाई असणार आहे. आमचे आंदोलन सरकारच्या विरोधात आहे, की सरकारच्या बाजूने आहे हे सरकारने शोधावे. आम्ही मागणी करत आहोत. सरकारमध्ये आहोत म्हणून मागणी करू नये, असा काही कायदा नाही. सरकारला वाटले की हे आंदोलन विरोधात आहे. तरी त्याची तमा नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
बच्चू कडू म्हणाले, आम्ही अयोध्येला पोहचून प्रभू रामचंद्राचे दर्शन घेणार आहोत. देवाला कापूस, ऊस, संत्री, सोयाबीनचा नैवैद्य अर्पण करणार आहोत. या सरकारला बुद्धी दे, ही प्रार्थना प्रभू रामचंद्राकडे करणार आहोत. आर्थिक आरक्षणाची लढाई देखील आम्ही सुरू करणार आहोत. राष्ट्रवादी किसान दलने आम्हाला आमंत्रित केले आहे. शहिदांचे स्मरण व्हावे आणि शेतकऱ्यांचे मरण होऊ नये, यासाठी ‘मेरा देश मेरा खून’ हे अभियान आम्ही राबवणार आहोत.
हेही वाचा : सियाचिन ग्लेशियरमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीराचे निधन, सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हिंदू, मुस्लिम, दलित या सगळ्यानी बलिदान दिले आहे. शेतकरी आणि शेतमजूरांना सोबत घेऊन एक आंदोलन आम्ही सुरू करत आहोत, आम्ही आता आर्थिक आरक्षणाची लढाई सुरू करणार आहोत. आम्ही संपूर्ण भारतभर फिरणार आहोत. शहिदांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही हे अभियान काढत आहोत, असे बच्चू कडू म्हणाले.