अमरावती : तीन खासगी बसमधून अमरावतीच्या भाविकांना महाकुंभला नेल्यानंतर युवा स्वाभिमानी पक्षाच्या एका कार्यकर्त्याने पळ काढल्याची घटना समोर आली आहे. अमरावतीहून प्रयागराजला गेलेल्या भाविकांची तीन दिवस जेवणाची आणि झोपण्याची सोय झाली नाही. त्यामुळे भाविक चांगलेच संतप्त झाले. सूरज मिश्रा, असे त्या व्यक्तीचे नाव असून तो आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आहे. प्रयागराजमधून येताच भाविकांनी त्याच्याविरोधात अमरावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सूरज मिश्रा याने अमरावतीवरून कुंभमेळ्यासाठी तीन ट्रॅव्हल्सद्वारे भाविकांना प्रयागराजला नेले होते. पण त्याठिकाणी सूरज मिश्रा आम्हा भाविकांना सोडून पळून गेला, असा आरोप अमरावतीच्या भाविकांनी केला. त्याच्या आधारावर गेलेल्या भाविकांची फसवणूक झाली. भाविकांनी सूरज मिश्राशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे भाविकांची तीन दिवस जेवण आणि झोपण्याची व्यवस्थाच झाली नाही. त्यामुळे भाविक संतप्त झाले.
शनिवारी हे भाविक अमरावतीत दाखल होताच त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. सूरज मिश्रा हा आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता असल्याने त्याच्या विरोधात तक्रार नोंद करून घेण्यासाठी पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप भाविकांनी केला. या टाळाटाळीमुळे भाविक अधिक संतप्त झाले. पोलीस प्रतिसाद देत नसल्याने संतप्त भाविक पोलीस मुख्यालय येथे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या भेटीला गेले. पण त्या ठिकाणीही त्यांना अडवण्यात आले. अखेर पोलीस उपायुक्तांनी फ्रेजरपुरा पोलिसांना भाविकांची तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश दिले.