अमरावती : मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्‍यू कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्‍यात येत असल्‍याचा दावा सरकारकडून करण्‍यात येत असला तरी, बालमृत्‍यू, मातामृत्‍यूचे प्रमाण कमी होऊ शकलेले नाही. गर्भवती महिलेसाठी रुग्‍णवाहिका वेळेवर न मिळाल्‍याने अर्भकाचा मृत्‍यू झाला आणि त्‍यानंतर मातेचाही मृत्‍यू झाल्‍याची दुर्दैवी घटना मेळघाटातील दहेंद्री या गावात घडली आहे.

कविता अनिल साकोम (२०, रा. दहेंद्री) असे मृत विवाहितेचे नाव आहे. कविता हिची शनिवारी दुपारी रुग्‍णवाहिका न मिळाल्याने घरीच प्रसूती झाली होती. बाळाचा पोटातच मृत्‍यू झाला होता. शासकीय रुग्‍णवाहिका न मिळाल्‍याने तिला खाजगी वाहनाने चुर्णी येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर अचलपूरच्‍या उपजिल्‍हा रुग्‍णालयात आणि नंतर अमरावतीच्‍या जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात हलविण्‍यात आले. मात्र रविवारी सकाळी कविता हिचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा – उत्कृष्ट संसदपटू! आमदार समीर कुणावार यांना पुरस्कार मिळण्याचे कारण काय…

दहेंद्री गावात आरोग्य विभागाने रुग्‍णवाहिका उपलब्ध करून दिली असती तर कदाचित महिलेचा जीव वाचला असता. तीन दिवसांपूर्वी सोनोग्राफीसाठीसुद्धा आरोग्य विभागाने रुग्‍णवाहिका उपलब्ध करून दिली नव्हती, असा आरोप महिलेच्या सासू व पतीने केला आहे. कविता हिचा पती अनिल साकोमने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी माझ्या पत्नीची तब्येत अचानक बिघडली होती. आम्ही रुग्‍णवाहिकेसाठी फोन केला मात्र रुग्‍णवाहिका आली नाही. त्यामुळे पत्नीची घरीच प्रसुती झाली. बाळाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मी खासगी गाडी घेऊन पत्नीला चुर्णी येथे रुग्णालयात घेऊन गेलो. तिथून तिला अचलपूर येथे नेले. तेथून डॉक्‍टरांनी अमरावती येथे हलविण्‍यास सांगितले, पण तिथे उपचारादरम्‍यान पत्‍नीचा मृत्‍यू झाला. वेळेवर रुग्‍णवाहिका मिळाली असती, तर तिचे प्राण वाचू शकले असते, असे कविताच्‍या पतीचे म्‍हणणे आहे.

मेळघाटात गेल्‍या एप्रिल ते ऑगस्‍ट या पाच महिन्‍यांत १३ बालमृत्‍यू, चार उपजत मृत्‍यू तर दोन मातांचा मृत्‍यू झाला आहे. चिखलदरा तालुक्‍यातील जामुननाला येथील एक महिन्‍याच्‍या बालकाचा त्‍याच्‍या आईच्‍या मृत्‍यूनंतर २२ दिवसांनी गेल्‍या २२ ऑगस्‍ट रोजी चिखलदरा येथील रुग्‍णालयात मृत्‍यू झाला. अजूनही मेळघाटातील बालमृत्‍यूंना आळा घालता आलेला नाही.

हेही वाचा – नागपूर : माळरानाच्या संवर्धकासमोर किडनी आजाराचे मोठे आव्हान

महिला बाल विकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मेळघाटात काही नावीन्यपूर्ण उपक्रमसुद्धा सुरू आहेत. नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी एक दिवस मेळघाटासाठी हा उपक्रमसुद्धा राबविण्यात आला. तरीही हा प्रश्‍न सुटलेला नाही.