अमरावती : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता दंडात्मक कारवाई सुरू केली असून, उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर जागीच कारवाई करण्यात येत आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करून ते घंटागाडीत टाकण्याची व्यवस्था असताना सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करण्याचे प्रमाण वाढले होते. महापालिकेच्या स्‍वच्‍छता विभागाकडून ही कारवाई केली जात आहे.

शहरातील कचऱ्यामुळे आजार होत असल्याने नागरिकांनी इतर ठिकाणी कचरा टाकू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. मात्र अनेक भागात अस्वच्छता दिसून येत होती. शहरातील विविध भागांत उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने या कचऱ्याचा त्रास नागरिकांना होत आहे. याची दखल घेत महापालिकेचा स्‍वच्‍छता विभागाने आता थेट कारवाई सुरू केली आहे. महापालिकेच्या उपायुक्‍त डॉ. मेघना वासनकर यांनी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश स्‍वच्‍छता विभागाला दिले होते.

आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर स्‍वच्‍छता विभागातील कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली. ज्या भागात कचरा टाकला जातो. तेथे सकाळी आणि संध्याकाळी गस्त घातली जात आहे. सदर ठिकाणी कचरा टाकण्यात येऊ नये, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करुन कचऱ्यामुळे होणाऱ्या आजारांची, तसेच शहराच्या विद्रुपीकरणाची माहिती नागरिकांना दिली जात आहे. महापालिकेने केलेल्या जनजागृतीनंतर देखील काही ठिकाणी नागरिक कचरा टाकत असल्याचे लक्षात आल्याने संबंधित नागरिकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी दिली.

शहरातील महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये कचरा टाकला जात असलेल्या जागांचा शोध घेण्यात आला असून तेथे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेचे कर्मचारी तेथे जाऊन जनजागृती करत आहेत. महापालिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत कचरा टाकणाऱ्यांना पहिल्यांदा समज दिली जाते. त्यानंतरही यामध्ये बदल न झाल्यास कचरा टाकणाऱ्यांकडून दंड घेतला जातो. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे या नियमाखाली हा दंड घेतला जात आहे. या नियमाखाली पाचशे ते पाच हजार रूपयांचा दंड घेण्याची तरतूद असल्याचे उपायुक्‍त डॉ. मेघना वासनकर यांनी सांगितले. यापुढील काळातही ही कारवाई सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शहरातील ज्या ठिकाणी कचरा टाकण्यात आला, त्या जागा स्वच्छ करण्याची मोहीमदेखील महापालिकेने सुरू केली आहे. पुढील काही दिवस ही मोहीम देखील सुरु ठेवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.