अमरावती : पन्नास टक्क्यांहन अधिकच्या सरकारी अनुदानावर अवलंबून असलेले आणि कोणत्याही नव्या योजनांचा समावेश नसलेले ८८७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासक तथा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी शुक्रवारी सादर केले. मालमत्ता करासह इतर करांमधून ३३७ कोटी रुपयांचे उत्पन्न गोळा करण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालताना तारेवरची कसरत आयुक्तांना करावी लागणार आहे.
आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी २९ ठिकाणी शासनाची आरोग्य मंदिरे प्रस्तावित होती. त्यापैकी २० आरोग्य मंदिरे कार्यान्वित झाली असून ती पूर्ण क्षमतेने सुरु आहेत. उर्वरीत ९ आरोग्य मंदिरे या वर्षी कार्यान्वित करण्यात येईल. या शिवाय पालिकेचे ९ प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्य सुविधा या अर्थसंकल्पीय शीर्षात १३०.७५ कोटी इतकी तरतूद करण्यात आली असून ती एकूण खर्चाच्या ३२.६३ टक्के इतकी आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
महानगरपालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी सर्व ६३ शाळा डिजीटल झालेल्या असून सर्व वर्गखोल्या डिजीटल करण्याचे प्रस्तावित आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
सन २०२५-२६ या वर्षात महानगरपालिकेची प्रारंभिक शिल्लक १६१.७१ कोटी रुपये यामध्ये महसूली शिल्लक १.०३ कोटी, भांडवली शिल्लक १४४.२३ कोटी, असाधारण ऋण व निलंबन शिल्लक १६.४५ कोटी रुपयांचा समावेश आहे. सर्व बाजूने मिळणारे महसूली उत्पन्न ४०१.२० कोटी, भांडवली उत्पन्न ३०३.९७ कोटी, असाधारण ऋण व निलंबन उत्पन्न २०.८० कोटी रुपयांचा समावेश आहे. असे एकूण ७२५.९७ कोटी इतके उत्पन्न अपेक्षित केलेले आहे.
परंतु, भांडवली खर्चासाठी प्रारंभिक शिल्लक १४४.२३ कोटी व भांडवली उत्पन्न ३०३.९७ कोटी असे एकूण ४४८.२० कोटी प्राप्त निधीचा विनियोग शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार करावा लागतो, त्यामुळे महापालिकेकडील प्रारंभिक महसूली शिल्लक १.०३ कोटी व महापालिकेचे एकूण महसूली उत्पन्न ४०१.२० कोटी असे एकूण ४०२.२३ कोटी रुपये एवढे महसूली उत्पन्न आहे. यामधूनच महापालिकेला प्रलंबित व आवश्यक खर्चाची कामे करावी लागतात, असे सचिन कलंत्रे यांनी सांगितले.
सन २०२५-२६ मध्ये एकूण खर्च ७३९.७४ कोटी इतका अपेक्षित आहे, यामध्ये महसूली खर्च ४००.६६ कोटी, भांडवली खर्च ३१६.२८ कोटी व असाधारण ऋण व निलंबन खर्च २२.८० कोटी रुपयांचा समावेश आहे. वर्षाअखेर महसूली अखेरची शिल्लक १.५७ कोटी, भांडवली अखेरची शिल्लक १३१.९२ कोटी, व असाधारण ऋण व निलंबन अखेरची शिल्लक १४.४६ कोटी, अशाप्रकारे एकूण १४७.४६ कोटी शिल्लक राहील, असे आयुक्तांनी सांगितले. सन २०२५-२५ या आर्थिक वर्षात नविन मालमत्ता कराच्या कक्षेत आणल्यामुळे तसेच सुधारित दराने कर आकारणी करण्यात येत असून महसूली उत्पन्नाचे इतर स्त्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.