अमरावती : येथील औद्योगिक वसाहतीत सुरू असलेला बनावट देशीदारू कारखाना पोलीस प्रशासनाच्या वतीने उद्ध्वस्त करण्यात आला आहे. या कारवाईत १० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ३ संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हा बनावट देशी दारू निर्मिती करणारा कारखाना सुरू होता. एमआयडीसीतील बंद कारखाना भाडेतत्वावर घेऊन तेथे एका नामांकित देशी दारू ब्रँडची कॉपी करून बनावट दारू निर्मिती व विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने या बनावट दारू कारखान्‍यावर छापा टाकला. तेथे पोलिसांना बॉटलिंग प्‍लांट आणि पॅकिंग युनिट आढहून आले. पोलिसांनी या ठिकाणाहून हर्षवर्धन रमेश सपकाळ (४२, मोतीनगर बगीच्याजवळ), सागर सुरेश तिवारी (४३, गणपती नगर) व योगेश विकास प्रधान (२४, किरण नगर) या तिघांना ताब्‍यात घेतले. या कारखान्‍यात देशी दारू बॉबी संत्रा आणि देशी दारू टॅंगो पंच या कंपनीच्या देशी दारूच्या नकली मालाची निर्मिती केली जात होती, अशी माहिती मिळाली आहे. याप्रकरणी तिनही आरोपींविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : पाच महिन्यांत ६ रुग्णांचा बळी, गडचिरोलीत हिवतापामुळे चिंता

आरोपींनी कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात निर्मित होणाऱ्या देशी दारू ‘बॉबी संत्रा’ व ‘टॅंगो पंच’ या मूळ कंपनीप्रमाणेच हुबेहुब देशी दारूच्या नकली मालाची निर्मिती सुरू केली होती. त्यासाठी आवश्यक असलेले अल्कोहोल, संत्र्याचा सुगंध, पाणी शुद्धीकरण संयंत्र, बाटल्‍यांमध्‍ये दारू भरण्‍याचे यंत्र, बूच लावण्‍याचे यंत्र, मुद्रण साहित्य, खोके, रिकाम्या बाटल्‍या, स्टॅम्प, मुद्रित सेलो टेपच्या माध्यमातून बनावट देशी दारूची निर्मिती चालविली होती. कोल्हे साखर कारखाना त्या दारूची निर्मिती व पॅकिंगसाठी जे साहित्य वापरते, त्याची आरोपींनी हुबेहुब नक्‍कल केल्‍याचे निदर्शनास आले.

हेही वाचा : ‘या’ विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा खर्च सरकार उचलणार

तीनही आरोपी ही नकली दारू जिल्हयातील अवैधरीत्या किरकोळ विक्रेत्यांना विकत होते. आरोपींकडून कार, नकली देशी दारूने भरलेल्या ३४०० बाटल्‍या असा एकूण १० लाख ९० हजार २४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्‍त नविनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्‍त कल्पना बारवकर व गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्‍हे शाखेचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, मनिष वाकोडे, योगेश इंगळे व अनिकेत कासार यांच्या चमूने ही कारवाई केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati police destroyed fake liquor factory in midc area packing liquor by copying brand names mma 73 css