अमरावती : सणासुदीच्या काळात अमरावती ते पुणे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. दिवाळीच्या दिवसांत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाने नियमित फेऱ्यांसोबतच विशेष योजना राबविली. अमरावती विभागातर्फे तब्बल २५ बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. पुणे ते अमरावती दरम्यान १०२ फेऱ्या आणि अमरावती ते पुणे दरम्यान ८० फेऱ्यांची वाहतूक करण्यात आली. अशा एकूण १८२ फेऱ्यांमधून एसटी महामंडळाला ३८ लाख १ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
अमरावती-पुणे-अमरावती या प्रवास व्यवस्थेचा लाभ एकूण ९ हजार ४५६ प्रवाशांनी घेतला. गेल्या वर्षी याच कालावधीत एसटी महामंडळाने ११४ फेऱ्यांचे नियोजन केले होते, त्यातून २८ लाख ३१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले होते, तर ६ हजार २०० प्रवाशांची वाहतूक केली होती. यंदा प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच उत्पन्नातही भरघोस वाढ झाली आहे. दिवाळीच्या वीस दिवसांमध्ये एसटी महामंडळाच्या अमरावती विभागाने ८ कोटी १६ लाख ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. गेल्या वर्षी ६ कोटी ९४ लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले होते.
हेही वाचा – ताडोबात कॉलरवाली वाघिणीचा कुटुंबकबील्यासह संचार, पर्यटक सुखावले
भाडेवाढीचा परिणाम नाही
एसटी महामंडळाने प्रवासी भाड्यामध्ये केलेल्या १० टक्के भाववाढीचा विशेष परिणाम झालेला नाही. प्रवाशांची संख्या वाढण्यासोबतच उत्पन्नातही वाढ झाली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासी वाहतुकीसाठी एकूण ४०० फेऱ्यांचे नियोजन करण्यात येते. नियमित फेऱ्यांपैकी २५ टक्के उत्पन्न हे लांब पल्ल्याच्या वाहतुकीतून होत असते, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.