अमरावती : मध्य रेल्वेने अमरावती व पुणे या दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या द्वि साप्ताहिक विशेष रेल्वेला मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम विदर्भातून पुणे येथे नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून त्यांची मोठी सोय झाली आहे.
आधी ही रेल्वेगाडी २८ जानेवारीपर्यंत अधिसूचित होती. गाडी क्र. ०१४३९ पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेस २ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत दर शुक्रवारी व रविवारी पुणे स्थानकावरून रात्री २२:५० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी १७:३० वाजता अमरावती स्थानकावर पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०१४४० अमरावती-पुणे विशेष एक्स्प्रेस ३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ या कालावधीत शनिवार व सोमवारी अमरावती स्थानकावरून १९:५० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी १६:२० वाजता पुणे स्थानकावर पोहोचणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग रेल्वे प्रबंधक कार्यालयाने दिली आहे.