अमरावती : युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने येथील सायन्सकोर मैदानावर आयोजित कृषी प्रदर्शनात आचारसंहितेचा भंग झाल्याचा ठपका ठेवून प्रदर्शनस्थळी प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांचे फलक जिल्हा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी हटवले.
सध्या अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. युवा स्वाभिमान पक्षाने येथील सायन्सकोर मैदानावर कृषी महोत्सव आयोजित केला. त्याचे उद्घाटन खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आले. यावेळी राणा दाम्पत्यासह शहरातील मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा >>> “हसन मुश्रीफांना विकत…”, अमोल मिटकरींचा किरीट सोमय्यांवर खळबळजनक आरोप
महोत्सवस्थळी प्रवेशद्वारावर स्वागत फलक लावण्यात आले होते. कमानीवर राणा दाम्पत्याची छायाचित्रे होती. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्रांचे फलक देखील ठिकठिकाणी लावण्यात आले होते.राजकीय पक्षाचा हा कार्यक्रम असल्याने आणि छायाचित्रांमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा ठपका ठेवून हे फलक शुक्रवारी हटविण्यात आले. कृषी महोत्सवाची व्यवस्था करण्याची जबाबदारी शांती इव्हेंट अॅन्ड मॅनेजमेंट या कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. या कंपनीला आता प्रदर्शन बंद करून मैदान रिकामे करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
आधी प्रदर्शनासाठी १२ ते १६ जानेवारीपर्यंत परवानगी देण्यात आली होती. पण, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ही परवानगी रद्द करण्यात येत असून कृषी महोत्सव निवडणूक संपल्यावर आयोजित करावा, असे निर्देश देण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मॅनेजमेंट कंपनीला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. हे मैदान जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहे. कृषी प्रदर्शन बंद करण्यास सांगण्यात आल्याने राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
कृषी महोत्सव बंद करण्यासाठी दबाव – रवी राणा
बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने येथील सायन्सकोर मैदानावर आयोजित केलेल्या कृषी महोत्सवात आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवून प्रशासनाने महोत्सवाला परवानगी नाकारली असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दबावातून ही कारवाई केली जात असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे.