अमरावती : वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या २४ वर्षीय विवाहितेचे एका २३ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. या तरुणासोबत पीडित महिला ५ मे रोजी घरून निघून गेली, पण तिच्यावर कारमध्ये प्रियकराने बलात्कार केला, त्यावेळी एका मित्राने हात पकडून ठेवले, तर दुसऱ्याने मोबाईलमध्ये व्हीडिओ काढला. तीन दिवस सोबत राहिल्यानंतर प्रियकर या पीडित महिलेला सोडून निघून गेला. या घटनेची तक्रार महिलेने पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, पतीने देखील तिला सोबत ठेवण्यास नकार दिला आहे.
मयूर रामदास मंदूरकर (वय २३) असे प्रियकराचे नाव असून, त्याचा मित्र सतीश व रिकेश यांच्याविरुध्द देखील गुन्हा दाखल झाला आहे. मयूरचे गावातील एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. गेल्या ५ मे रोजी मयूरने या महिलेला भेटायला बोलावले. त्यानंतर तो तिला मित्राच्या घरी घेऊन गेला. तेथे मित्राच्या चारचाकी वाहनात मयुरने तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी रिकेशने तिचे हात पकडले, तर सतीशने मोबाईलमध्ये व्हीडिओ काढला. त्यानंतर मयूर हा तिला मित्राच्या पोल्ट्री फार्मवर घेऊन गेला. तेथे तीन दिवस तिच्यावर अत्याचार केला, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा >>> वर्धा: पाच लुटारुंचा धुमाकूळ; लुटमार करीत भाजप नेत्यावर हल्ला
दरम्यान, पीडितेच्या पतीने पत्नी बेपत्ता असल्याबाबत वलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी शोध घेत तिला मयूरसह पोलीस ठाण्यात आणले. तेव्हा आपण स्वमर्जीने मयूरसोबत गेल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले होते. त्यानंतर १३ मे रोजी मयूर हा आपल्याला सोडून गेल्याची तक्रार पीडित विवाहितेने पोलिसांत दिली. त्यावेळी पीडित विवाहितेला पतीने सोबत घेऊन जाण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी या महिलेला जिल्हा स्त्री रुग्णालयातील वनस्टॉप सेंटरमध्ये दाखल केले.