अमरावती : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत मोठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक ही आणि अशी विविध संवर्गातील एकूण १७५ पदे भरली जाणार आहेत.

आदिवासी विकास विभागाकडून आयबीपीएस कंपनीच्या माध्यमातून १७ संवर्गातील ६११ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत १७५ जागांसाठी येत्या ९ एप्रिलला लेखी परीक्षा पार पडणार आहे. त्यात गृहपालपदाच्या ९१ (पुरुष ६२, महिला – २९) तर अधीक्षकपदाच्या ८४ (पुरुष – २९, महिला- ५५) जागांचा समावेश आहे. उर्वरित पदांच्या लेखी परीक्षा आगामी काळात टप्प्याटप्प्याने घेण्याचे नियोजन सुरू आहे. रिक्त जागा भरण्यासाठी परीक्षांचे आयोजन करण्यात येत आहे.

आदिवासी विकास विभागात शिक्षणासह सर्वच विभागांत रिक्त पदांमुळे नागरिकांना सेवा देण्यास होणारा विलंब त्यातून होणारी विभागाची बदनामी टाळण्यासाठी कमीतकमी पदभरती तरी करावी, यासाठी विभागाने प्रक्रिया सुरू केली. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार १७ संवर्गातील ६११ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. त्यानुसार आता टप्प्या टप्याने परीक्षांचे आयोजन आदिवासी विकास विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

ही पदे भरली जाणार…

वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, उपलेखापाल, मुख्य लिपिक, सांख्यिकी सहायक (वरिष्ठ), आदिवासी विकास निरीक्षक (नॉनपेसा), वरिष्ठ लिपिक – सांख्यिकी सहायक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघुटंकलेखक, गृहपाल – स्त्री, गृहपाल – पुरुष, अधीक्षक – स्त्री, अधीक्षक – पुरुष, ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक, कॅमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक आदी विविध पदे भरली जाणार आहेत. तब्बल ६११ पदे असल्याचे आदिवासी विकास विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दरम्यान, गृहपाल स्त्री, गृहपाल -पुरुष, अधीक्षक स्त्री, अधीक्षक पुरुष पदाच्या लेखी परीक्षेचे हॉल तिकीट पात्र व इच्छुक उमेदवारांना https://tribal.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून लवकरच डाउनलोड येणार आहे. परीक्षेच्या अद्ययावत माहितीसाठी संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, ९ एप्रिलला होणाऱ्या परीक्षेच्या आधी ७ पदांच्या १०७ जागांसाठी परीक्षा यापूर्वीच झाली आहे.