अमरावती : प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) निर्देशानुसार २०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांना आधुनिक तंत्रज्ञानयुक्त उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवून घेण्यासाठी अमरावतीकरांचा अल्प प्रतिसाद असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात एप्रिल २०१९ पुर्वी नोंदणी झालेली ७ लाखांवर वाहने असून आतापर्यंत केवळ ५ हजार ४८२ जुन्या वाहनधारकांनी वाहनांच्या जुन्या पाट्या बदलून, आधुनिक पाट्या बसविल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १५ हजार ९२७ वाहनधारकांनी नंबर प्लेट बदलून घेण्यासाठी नोंदणी केली आहे, तर ९ हजार ७९५ वाहनधारकांनी अपॉइंटमेंट घेतली आहे.

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये अदलाबदल व बनावटगिरीच्या गुन्ह्यांना आळा घालणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवण्यासाठी केंद्रीय मोटर नियमाप्रमाणे बंधनकारक केले आहे. दरम्यान १ एप्रिल २०१९ पूर्वी ज्यांनी वाहन खरेदी केले, अशा सर्व वाहनांवर आता ‘एचएसआरपी’ प्लेट लावावी लागणार आहे. जिल्ह्यात एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेले ७ लाख ५२ हजार ६८५ वाहने आहेत. अमरावती शहर व जिल्ह्यात असे एकूण २७ केंद्र निश्चित केलेत. ‘एचएसआरपी’ बसवून घेण्यासाठी शहर व जिल्ह्यातील वाहनचालकांना https://mhhsrp.com या पोर्टलवरून ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. त्यानंतर ठरवून दिलेल्या ठिकाणाहून ‘एचएसआरपी’ बसवून घ्यावी लागणार आहे.

केंद्रीय मोटार नियम १९८९ चे नियमानुसार सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’  बसविणे बंधनकारक आहे. वाहन विक्रेत्याकडून १ एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. मात्र १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार लावणे बंधनकारक केले आहे. अन्य राज्यात जीएसटी वगळून दुचाकीचे दर प्रतिवाहन ४२० ते ४८० रुपये, तीन चाकी वाहन ४५० ते ५५०, चार चाकी वाहन व जड वाहने ६९० ते ८०० रुपये आहेत. तर महाराष्ट्रात जीएसटी वगळून दुचाकी प्रतिवाहन ४५० रुपये, तीन चाकी ५००, चार चाकी व जड वाहने ७४५ रुपये असे दर आहेत.

जुन्या वाहनांना ही पाटी बसविण्याकरिता तीन उत्पादकांची परिवहन विभाग मार्फत निवड केली आहे. वाहन मालकांनी वाहनांवर ही पाटी बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता शुल्काचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करावा. ही पाटी बसविण्याकरता वाहन मालकांनी वैयक्तिकरित्या होम फिटमेंट सर्विस या पर्यायाचा वापर केल्यास त्यांना अतिरिक्त शुल्काचा भरणा करावा लागणार आहे, असे सांगण्यात आले आहे.