अमरावती : अकोला येथून अमरावतीकडे येत असलेल्या शिवशाही बसला बडनेरा ते अमरावती मार्गावर बडनेरा पोलीस ठाण्यासमोर टायर फुटून अचानक आग लागली. यामुळे या वर्दळीच्या मार्गावर एकच गोंधळ उडाला. सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अमरावती महापालिकेच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. वेळीच सावधगिरी बाळगत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अमरावती-बडनेरा मार्गावर नेहमीप्रमाणे वर्दळ होती. शुक्रवारी सकाळी अकोल्याहून एमएच ०६ / बीडब्ल्यू ०९०३ क्रमांकाची शिवशाही बस अमरावतीकडे येण्यासाठी निघाली. ही बस बडनेरा शहराच्या हद्दीत पोलीस ठाण्यासमोर आली असताना मागील टायर अचानक फुटून आवाज झाला. बसचे संतुलन बिघडल्यानंतरही बसचालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवली. गाडी पंक्चर झाल्यामुळे सर्व प्रवासी बस बाहेर उतरत असताना अचानक बसच्या उजव्या बाजूने पेट घेतला. काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही बाजूंची वाहतूक नियंत्रित केली. बसमधून वीस जण प्रवास करीत होते. सर्व प्रवाशी सुखरूप आहेत.
हेही वाचा – ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सरकारी बांधकामे ठप्प, ही आहेत कारणे
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसचा अर्धा भाग जळून काळा पडला होता. अमरावती महापालिकेच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी येऊन आग आटोक्यामध्ये आणली. या वेळी महामार्ग परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती.
शिवशाही बसला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. ४ एप्रिल २०२३ रोजी कोंढाळीजवळील साईबाबा मंदिर परिसरात शिवशाही बसला आग लागली होती. नागपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या शिवशाही बसला अचानक आग लागून बस जळून पूर्णपणे खाक झाली होते. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर आले आणि ते बचावले होते. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण या आगीत काही प्रवाशांचे सामान जळाले होते. बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाला दिसल्यानंतर त्याने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि कंडक्टर व प्रवाशांना सावध केले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती.
हेही वाचा – वाढदिवसाच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेऊन मैत्रिणीशी बळजबरी शारीरिक संबंध
सुमारे महिनाभरापूर्वी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगावपेठ नजीक भरधाव शिवशाही एसटी बस रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता, तर २८ जण जखमी झाले होते.