नागपूर : परिवहन खात्यात २३ प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचा वाद सुरू आहे. आता अमरावतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजकुमार वर्धेकर (बागडी) यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यासाठी बनावट कागदपत्राचा वापर केल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे वर्धेकरांच्या सेवा समाप्तीचे आदेश काढण्यात आले आहे.
अमरावतीच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने २३ डिसेंबर २०२२ रोजी परिवहन आयुक्त कार्यालयाला राजकुमार वर्धेकर यांच्या जन्मदिनांकामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला. त्यावर वाद सुरू झाल्यावर परिवहन आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त (लेखा) विद्यासागर हिरमुखे यांच्या नेतृत्वात चौकशी समिती स्थापन करण्यात आली. समितीने अनेकदा वर्धेकर यांना हजर राहून बाजू मांडण्यास सांगितले. परंतु, ते गैरहजर राहिले. तपासात त्यांनी नागपूर महापालिकेचा जोडलेला जन्म दाखला बनावट आढळला. वर्धेकर यांची जन्मतारीख २२ सप्टेंबर १९६४ असल्याचे पुढे आले. त्यांच्या सेवापुस्तकातही खाडाखोड आढळली. वर्धेकर हे ३० ऑक्टोबर २०२२ रोजी निवृत्त होणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी शासनाची फसवणूक केली. त्यामुळे १६ ऑगस्ट २०२४ रोजी वर्धेकर यांची सेवा समाप्त करण्यात आली. या विषयावर राजकुमार वर्धेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
आणखी वाचा-चंद्रपूर : खासदार प्रणिती शिंदे म्हणतात, ‘विरोधी पक्ष नेता आमचा मुख्यमंत्री…’
लोकायुक्तांकडे तक्रार
वर्धेकर यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यासाठी बनावट कागदपत्र वापरल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते यश शर्मा यांच्याकडून लोकायुक्तांकडे करण्यात आली होती. वर्धेकर यांच्या वेतनाची रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
वर्धेकर यांनी जन्मतारीख बदलण्यासाठी काही बनावट कागदपत्र दिल्याचे चौकशीत पुढे आले. त्यामुळे त्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश शासनाने काढले. -विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई.
आणखी वाचा-नागपुरात वादळी पाऊस, काही मिनिटांतच रस्ते पाण्याखाली
प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचा वाद काय?
पारदर्शक बदलीचा आव आणणाऱ्या परिवहन खात्याने २३ उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी तात्पुरती पदोन्नती देत पदस्थापनेसाठी सोडत (लकी ड्रॉ) काढली. परंतु, दुसऱ्याच दिवशी पाचहून अधिक अधिकाऱ्यांच्या सोडतीत निघालेली पदस्थापना बदलली गेल्याचा आरोप असून ही प्रक्रियाच वादात सापडली आहे. सोडतीत जयंत पाटील यांची बोरीवली पदस्थापना निघाली असताना त्यांना पनवेल, हेमांगिनी पाटीलला सोलापूर ऐवजी ठाणे, संजय मेत्रेवारांना परिवहन आयुक्त कार्यालय, प्रदीप शिंदेंना पुणे ऐवजी नाशिक, रवींद्र भुयारांना नागपूर ग्रामीण ऐवजी अकोला, श्याम लोहींना पुणे ऐवजी चंद्रपूर, अर्चना गायकवाडांना चंद्रपूर ऐवजी पुणे येथे पदस्थापना दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे सोडतीनंतर दुसऱ्याच दिवशी पदोन्नतीची यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी काय झाले? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान परिवहन आयुक्त विवेक भिमानवर यांनी मात्र हे आरोप फेटाळात सर्व प्रक्रिया पारदर्शी झाली असून त्याचे कागदपत्र उपलब्ध असल्याचा दावा केला आहे.
© The Indian Express (P) Ltd