अमरावती : एका शिक्षिकेच्या मोबाईलवर रात्रीच्या वेळी कॉल करून मला तुमची आठवण येत आहे, असे म्हणणाऱ्या एका शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा तर शिक्षिकेने मुख्याधिकारी यांच्याकडे केलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्यांना धमकावणाऱ्या दोन महिलांविरुद्ध दर्यापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा : पालकांनी लग्न ठरवताच मुलीने घेतला गळफास!; घरच्या गरिबीने आई-वडील होते हतबल
श्रीकृष्ण अंबादास सोमवंशी रा. दर्यापूर असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पीडित शिक्षिका ह्या श्रीकृष्ण सोमवंशी याला गेल्या २० वर्षांपासून ओळखतात. त्या एका शाळेवर सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत, तर श्रीकृष्ण हासुद्धा शिक्षक म्हणून कार्य करतो. २८ ऑगस्ट रोजी रात्री श्रीकृष्णने या शिक्षिकेच्या मोबाईलवर कॉल केला. मला तुमची आठवण येते. तुम्ही मला कॉल करीत नाही म्हणून मीच तुम्हाला कॉल केला, असे तो म्हणाला. त्यावर शिक्षिकेने एवढ्या रात्री माझी आठवण का आली? अशी विचारणा श्रीकृष्ण याला केली. यावेळी त्याने शिक्षिकेसोबत लज्जास्पद वाटेल, असे संभाषण केले. त्यामुळे शिक्षिकेने या प्रकाराची तक्रार मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली. त्यावर मुख्याधिकारी यांच्याकडे केलेली तक्रार मागे घ्यावी, यासाठी दोन महिलांनी पीडित शिक्षिकेला धमकावले.
त्यामुळे पीडित शिक्षिकेने श्रीकृष्ण याच्यासह संबंधित दोन्ही महिलांविरुद्ध दर्यापूर ठाण्यात तक्रार दाखल करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली. तक्रारीवरून पोलिसांनी श्रीकृष्णसह दोन्ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.