अमरावती : उद्या १६ एप्रिलला अमरावती विमानतळ आणि प्रवासी विमानसेवेचे लोकार्पण होत असतानाच एअर इंडियाच्या वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या (एफटीओ) विमानाचेही प्रात्यक्षिक उड्डाण (डेमो फ्लाईट) होणार आहे. अमरावतीत एअर इंडिया आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या पुढाकारातून दक्षिण आशियातील सर्वात मोठी वैमानिक प्रशिक्षण संस्था स्थापन केली जात आहे. विमानतळ परिसरातच या ‘एफटीओ’चे बांधकाम सुरू आहे.

या ‘एफटीओ’मध्ये दरवर्षी १८० व्यावसायिक पायलट पदवीधर करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी ३१ सिंगल इंजिन आणि ३ ट्वीन इंजिन विमाने असतील.

एअर इंडियाच्या वतीने विमानतळाच्या १० एकर परिसरात अत्याधुनिक वैमानिक प्रशिक्षण संस्था विकसित करण्यात येत आहे. यात डिजिटल वर्गखोल्या, जागतिक दर्जाची वसतिगृहे, डिजिटल ऑपरेशन्स सेंटर, देखभाल सुविधा केंद्र उभारण्यात येत आहे. प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सोयीसुविधांची पायाभरणी केली जात आहे.

येत्या जुलैपासून वैमानिक प्रशिक्षण प्रारंभ होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या बांधकामास प्रारंभ देखील झाला आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने बेलोरा येथील विमानतळावर प्रस्तावित एअर इंडियाच्या वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे.

अमरावती येथील ‘एफटीओ’ हे भारतीय विमान वाहतूक अधिक स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असेल आणि भारतातील तरुणांना वैमानिक म्हणून उड्डाण करण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी संधी देणार आहे. या ‘एफटीओ’मधून बाहेर पडणारे तरुण वैमानिक एअर इंडियाच्या जागतिक दर्जाच्या एअरलाइन बनण्याच्या महत्त्वाकांक्षेला चालना देतील, अशी अपेक्षा एअर इंडियाचे एमडी आणि सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी व्यक्त केली आहे.

इच्छुक वैमानिकांना सर्वोत्तम जागतिक शाळांच्या बरोबरीने जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमासह प्रशिक्षण घेण्याची संधी हे ‘एफटीओ’ देईल. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक म्हणून भारताला आवश्यक असलेल्या विमान वाहतूक पायाभूत सुविधांच्या उभारणीत आणि आत्मनिर्भर भारतासाठी सरकारच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्यात आम्हाला आनंद होत आहे, असे एअर इंडियाच्या एव्हिएशन अकादमीचे संचालक सुनील भास्करन यांचे म्हणणे आहे.

दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या ‘एफटीओ’ची स्थापना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करण्यास निश्चितच प्रोत्साहित करेल ज्यामुळे महाराष्ट्र राज्य आणि भारतीय नागरिकांसाठी प्रेरणा आणि अभिमानाची भावना निर्माण होईल, असे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी सांगितले आहे.