लोकसत्ता टीम
अमरावती : अमरावती विमानतळावरून अलायन्स एअर कंपनीची मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा येत्या १६ एप्रिलपासून सुरू होणार असून शुभारंभानंतर पहिले विमान सकाळी ११.३० वाजता अमरावतीहून मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे.
दरम्यान, अलायन्स एअरने विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर केले असून संकेतस्थळावरून बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अमरावती ते मुंबई तिकिटाचे दर २ हजार १०० रुपये आहेत, पण गर्दीच्या दिवशी जास्त रक्कम मोजावी लागणार आहेत. येत्या १८ एप्रिलला अमरावती-मुंबई प्रवासाचे तिकीट दर संकेतस्थळावर ३ हजार ८६४ रुपये इतके दर्शविण्यात आले आहेत.
अलायन्स एअर ही विमान कंपनी अमरावतीवरुन मुंबई अशी विमान सेवा सुरू करत आहे. या विमानसेवेचे वेळापत्रक विमान कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे. सुरुवातीला आठवड्यातून तीन दिवस ही सेवा राहणार आहे. त्यानंतर यात वाढ केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. किमान तिकीट दर २१०० रुपये असले, तरी गर्दीच्या दिवसांमध्ये तिकिटाचे दर वाढवले जाऊ शकतात.
कसे असेल विमानाचे वेळापत्रक?
विमान सेवा आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी असणार आहे. येत्या १६ एप्रिलला पहिले विमान मुंबई विमानतळावरून सकाळी ८.४५ वाजता उड्डाण घेणार असून त्याच दिवशी विमानसेवेच्या शुभारंभानंतर सकाळी ११.३० वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. १८ एप्रिलपासून विमानसेवेच्या वेळेत बदल होणार आहे. १८ एप्रिलला विमान मुंबईवरुन दुपारी २.३० वाजता अमरावतीकडे निघेल. अमरावतीला ४.१५ वाजता पोहोचेल. तर अमरावतीवरुन दुपारी ४.४० वाजता विमान निघेल आणि सायंकाळी ६.२५ वाजता मुंबईत पोहोचेल.
१६ एप्रिला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
अमरावती विमानतळाचे बुधवार, १६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याचे पत्र महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक स्वाती पांडे यांनी जिल्हाधिकारी सौरभकटियार यांच्या नावे पाठविले. अलायन्स एअर लाइन्सचे विमान हे मुंबई विमानतळाहून सकाळी ८:४५ वाजता अमरावतीकडे रवाना होईल. त्याच दिवशी ते परत जाणार आहे.
प्रादेशिक संपर्क योजना (आरसीएस) उडानअंतर्गत व्यावसायिक विमानसेवा एटीआर-७२ अमरावती विमानतळाहून सुरू होत आहे. या लोकार्पण सोहळ्याला आमदार, खासदारांसह प्रशासकीय अधिकारी, राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. अमरावतीने आता हवाई नकाशावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.