अमरावती : अमरावती विमानतळावरून ३१ मार्चला प्रवासी विमानसेवा सुरू होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली खरी, पण अजूनही विमानसेवेचे वेळापत्रक आणि उद्घाटनाची तारीख निश्चित न झाल्याने प्रवासी विमानसेवा सुरू होण्याचा मुहूर्त लांबणीवर गेला आहे. येत्या १५ ते २० दिवसांमध्ये विमानसेवेचे उद्घाटन होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. अमरावती विमानतळावर नवीन धावपट्टी तयार करण्यात आली आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. १८ बाय ५० मीटरची ही धावपट्टी आहे. त्यामुळे येथून एटीआर हे ७२ आसनी विमान उडू शकणार आहे.

प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत मुंबई-अमरावती-मुंबई मार्गावर ‘अलायन्स एअर’ या कंपनीच्या माध्यमातून एटीआर ७२ आसनी विमान सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. विमानतळ आता प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज झाले आहे. गेल्या १३ मार्चला अमरावती विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) परवाना दिला. ‘रिजनल कनेक्टिव्हीटी स्कीम’ अंतर्गत अमरावती विमानतळ हे अधिकृत परवानाधारक विमानतळ म्हणून घोषित झाले. अलायन्स एअरची मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा सुरुवातीला आठवड्यातून तीनदा सेवा देईल.

अमरावती विमानतळाला ‘एव्हीटी’ हा ‘आयएटीए कोड’ प्राप्त झाला आहे. ‘आयएटीए’ ही आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना आहे. शासनाने घोषणा केली. परंतु, अलायन्स एअरलाइन्सने अद्याप वेळापत्रक घोषित केलेले नाही. ७२ आसनी विमान, विमानातील क्रू मेंबर्स, एअर होस्टेस, वैमानिक यांची नियुक्ती. त्याचप्रमाणे विमानतळावर कार्यालय, चेकइन, चेकआऊट, प्रवाशांचे बॅग्ज तपासणी करणारी यंत्रणा, सुरक्षा व्यवस्था, यासाठी लागणारे कर्मचारी अशी संपूर्ण व्यवस्था करावी लागते. प्रमाणीकरण चाचणी यशस्वी झाल्यानंतरच तिकिटांची विक्री सुरू होते, अशी माहिती विमान उड्डाण क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

दरम्यान, विमानतळाच्या परिसरात उद्घाटन समारंभाची तयारी सुरू झाली आहे. लवकरच उद्घाटनाची तारीख घोषित होऊ शकते, मात्र ३१ मार्चचा मुहूर्त टळला असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणत्याही एअरलाइन्सला त्यांची प्रवासी विमान सेवा सुरू करण्याची असेल, तर किमान १५ दिवस लागतात. कारण, विमानोड्डाणाची सर्व सूत्रे ही एअरलाइन्सच्या हातात असतात.

आता अमरावतीकरांना विमानसेवेच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा आहे. ‘अलायन्स एअर’च्या संकेतस्थळावर विमातळांच्या यादीत अमरावती हे नाव झळकत असले, तरी वेळापत्रक मात्र अद्याप घोषित झालेले नाही. आठवड्यातून तीन दिवस मुंबई-अमरावती-मुंबई विमानसेवा सुरू होण्याचे संकेत आहेत. अमरावती विमानतळावरून पहिल्या व्यावसायिक विमान उड्डाणाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.