अमरावती : जिल्ह्यात एकीकडे रस्ते अपघातांमध्ये नागरिक मृत्यूमुखी पडत असताना वाहतूक नियमांचे उल्लंघनाचे प्रमाणही अधिक असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. काही बेजबाबदार वाहन चालकांमुळे अपघात घडत आहे. वाहतुक पोलिसांकडून वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात ई-चलान यंत्राद्वारे कारवाई केली जाते. गेल्‍या दोन महिन्‍यांत अमरावती जिल्‍हा ग्रामीण पोलिसांनी तब्‍बल १ कोटी ८ लाख ९५ हजार रुपयांचा पेड आणि अनपेड दंड वसूल केला आहे.

जिल्‍ह्यातील ग्रामीण भागात १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या दोन महिन्‍यांत विशेष मोहिमेदरम्‍यान अनपेड ७४ लाख ९९ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्‍यात आला आहे. याशिवाय पेड दंडाचे प्रमाण वाढविण्‍याचे आदेश देण्‍यात आले होते. त्‍यानुसार ३३ लाख ३५ हजार १५० रुपयांचा दंड वसूल करण्‍यात आला. असा एकूण १.०८ कोटी रुपयांचा दंड शासनजमा करण्‍यात आला आहे.

वाहन चालविताना सिग्नल लाल रंगाचा असतानाही तो ओलांडणे, विना परवाना वाहन चालविणे, विरुद्ध दिशेने वाहने चालविणे, दुचाकी चालविताना शिरस्त्राण (हेल्मेट) वापरण्यास टाळाटाळ अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. वाहतुक पोलीस देखील नियमभंग करणाऱ्या चालकांच्या वाहन क्रमांकाचा केवळ छायाचित्र काढून ई-चलान करावाई करतात. त्यामुळे थकित दंड भरण्याकडे वाहन चालक दुर्लक्ष करत होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पोलिसांच्या कारवाईमध्ये पारदर्शकता यावी. यासाठी राज्यभरात ई- चलान यंत्रणाद्वारे कारवाई केली जाते. नियमांचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीला वाहनाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेशाद्वारे माहिती दिली जाते. त्यानंतर ती व्यक्ती ऑनलाईन किंवा वाहतुक पोलिसांच्या कार्यालयात जाऊन दंडाची रक्कम भरू शकते.

ग्रामीण पोलिसांनी ई-चलान दंड प्रलंबित असलेल्‍या वाहनचालकांच्‍या रहिवासी पत्‍त्‍यावर घरोघरी जाऊन नोटीस बजावली. यासाठी वाहतूक‍ पोलीस अंमलदारांचे पथक नेमण्‍यात आले आहे. ही मोहीम येत्‍या ३१ मार्च पर्यंत सुरू राहणार असून या कालवधीत वाहनधारकांकडून प्रलंबित असलेल्‍या ई-चलान दंडाचा भरणा करण्‍यात येणार आहे. याशिवाय संकेतस्‍थळवर ऑनलाईनद्वारे किंवा कोणत्‍याही वाहतूक अंमलदाराकडे ई-चलान यंत्राद्वारे दंडाचा भरणा करण्‍यात येणार आहे. ज्‍या वाहनधारकांनी दंड भरला नाही, त्‍या वाहनांविरूद्ध कारवाई करण्‍यात येत आहे. नागरिकांनी जागरूकता बाळगून वाहनावरील प्रलंबित ई-चलान दंड भरून शासनजमा करावे, असे आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले आहे.

Story img Loader