अमरावती येथील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे. यानंतर शंभूराज देसाई यांनी राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल आल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल अशी माहिती विधनसभेत दिली आहे. उद्धव ठाकरेंनी पोलिसांना चोरीच्या बाजूने तपास करा असा आदेश दिला होता आरोपही रवी राणा यांनी केला आहे. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाजमाध्यमावर संदेश प्रसारीत केल्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवी राणा यांनी काय मागणी केली?

“तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरुन हा तपास चोरीच्या दिशेने करण्यास सांगितलं होतं. खासदार नवनीत राणा आणि मीदेखील देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे गेलो होतो. राज्याचे मुख्यमंत्री प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं आम्ही सांगितलं होतं. त्यांनी एनआयएकडे तपास सोपवला होता. दिल्लीवरुन एनआयएचं पथक आलं तेव्हा नुपूर शर्माच्या समर्थनार्थ हिंदुत्वाच्या बाजूने पोस्ट केल्याने भरचौकात हत्या केल्याचं स्पष्ट झालं होतं,” असं अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी सांगितलं.

उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे; गृह मंत्रालयाने घेतला निर्णय

“हे प्रकरण दाबण्याचं काम राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. एसआयटीच्या मार्फत याची चौकशी झाली पाहिजे. उद्धव ठाकरेंनी पोलीस आयुक्तांना केलेल्या फोनचीही चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी रवी राणा यांनी यावेळी केली.

शंभूराज देसाईंनी काय आश्वासन दिलं?

“उमेश कोल्हे प्रकरणाची सविस्तर माहिती रवी राणा यांच्याकडून घेतली जाईल. तेथील पोलीस आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर त्यांचा आक्षेप आहे. राज्य गुप्तचर विभागाकडून या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल १५ दिवसांच्या आत मागवला जाईल. गृहमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे हा अहवाल सोपवला जाईल. अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल,” असं आश्वासन शंभूराज देसाईंनी दिलं आहे.

२१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश‍ कोल्हे हे दुकान बंद करून मोटरसायकलने घरी जात असताना रात्री १०.३० वाजताच्या सुमारास श्याम चौकातील घंटाघर परिसरात चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून सहा जणांना अटक केली होती.

दहशत निर्माण करण्यासाठी रचला कट; आरोपपत्रात दावा

उमेश कोल्‍हे यांच्‍या हत्या प्रकरणात तबलिगी जमात या संघटनेतील कट्टरवादी सदस्य सामील होते, असा दावा राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने (एनआयए) मुंबई येथील न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे. लोकांमध्‍ये दहशत निर्माण करण्‍यासाठी हे षडयंत्र रचण्‍यात आल्‍याचे एनआयएने म्‍हटले आहे. आरोपपत्रात तपास संस्थेने १७० हून जास्त साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati umesh kolhe murder case ravi rana demands sit uddhav thackeray phone call shamburaj desai answers sgy
Show comments