लोकसत्ता टीम
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी प्रक्रिया सुरू झाली असून चार सदस्यीय निवड समिती येत्या ११ आणि १२ जानेवारी रोजी कुलगुरूपदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. निवड प्रक्रिया का लांबत चालली आहे, याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात होत आहे.
तत्कालीन कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे २८ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. त्यानंतर कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे सोपविण्यात आला होता. डॉ. येवले हे ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असल्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार हा आता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांच्याकडे देण्यात आला आहे. शुक्रवारी त्यांनी पदभार स्वीकारला.
गेल्या वर्षभरापासून अमरावती विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू नाही. नवीन कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला बराच उशिरा सुरूवात करण्यात आल्याने दुसऱ्यांदा अन्य कुलगुरूंवर अतिरिक्त कार्यभार सोपविण्याची वेळ आली आहे.
आणखी वाचा-केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री म्हणतात, “एम्समध्ये हृदय प्रत्यारोपण व कॉकलिअर इम्प्लांट…”
अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी एकूण ११५ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते, त्यापैकी ७२ उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आल्यानंतर ४३ पात्र उमेदवारांपैकी निवडक उमेदवारांना मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. या पात्र उमेदवारांच्या नावांबाबत गोपनीयता ठेवण्यात आली आहे. मुलाखतीसाठी बोलविण्यात आलेल्या उमेदवारांना ई-मेल पाठविण्यात आले आहेत. पण, शर्यतीतील काही उमेदवारांना मुलाखतीचे ई-मेल न मिळाल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. कुलगुरूच्या निवडीच्या वेळी धक्कातंत्र वापरले जाईल, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे.
तत्कालीन प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या कारभारावर नागपूर युनिव्हर्सिटी टिचर्स असोसिएशन (नुटा) या संघटनेने अनेक आक्षेप नोंदविले होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेटचे (अधीसभा) अधिकृत गठन आल्यानंतर तशी अधीसूचनाही काढण्यात आली. परंतु ही माहिती राज्यपाल (कुलपती) व उच्च न्यायालयापासून लपविण्यात आल्याचा आरोप ‘नुटा’ने केला होता. त्यांच्या पात्रतेविषयीदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आता नवीन कुलगुरूच्या निवडीनंतर वाद उत्पन्न होऊ नये, अशी अपेक्षा शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा-अकोल्यात चक्क ‘पाकोळी’ पक्षांनी साकारली स्वतःची वसाहत, जाणून घ्या वैशिष्ट्ये…
चार सदस्यीय समिती घेणार मुलाखती
अमरावती विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूच्या निवडीसाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून त्यात अध्यक्षपदी कानपूर येथील आयआयटीचे डॉ. संजय धांडे, तर सदस्य म्हणून सुरत येथील एसव्हीएनआयटीचे डॉ. अनुपम शुक्ला, लखनौ विद्यापीठाचे डॉ. मनोज दीक्षित, नोडल अधिकारी म्हणून पुणे येथील शासकीय अभियांत्रिकीचे डॉ. सुजित परदेशी यांचा समावेश आहे. ही समिती पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती येत्या ११ आणि १२ जानेवारी रोजी घेणार आहे.